होमपेज › Belgaon › मतदान जागृती झाली, आता  शाळाप्रवेश आंदोलन

मतदान जागृती झाली, आता  शाळाप्रवेश आंदोलन

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 17 2018 11:29PMबेळगाव : प्रतिनिधी

मिरवणूक, मेळावे, प्रचारफेरी, आरोप, प्रत्यारोप, जय, पराजय अशा विविध वातावरणात गेला महिनाभर वावरलेल्या शिक्षण खात्यातील अधिकार्‍यांनी आता सरकारी शाळा प्रवेशासाठी आंदोलन हाती घेतले आहे. विधानसभा निवडणूक झालेल्या दुसर्‍या दिवसापासून म्हणजे 16 मे पासून शाळा प्रवेश आंदोलन सुरू झाले आहे. महिनाअखेरपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महिनाभर सर्वच खात्याचे अधिकारी कामकाजात व्यस्त होते. त्यांच्यावरील कामाचा ताण आता कमी झाला असून प्रवेश आंदोलन अंतर्गत अधिकारी, कर्मचारी गावागावात, गल्‍लोगल्‍ली फिरून मुलांना सरकारी शाळेत पाठवा, असे आवाहन करत आहेत. शाळेपासून दूर राहिलेल्या 5 वर्षे 8 महिने ते 14 वर्षेपर्यंतच्या मुलांना शाळेत प्रवेशासाठी आवाहन केले जात आहे.

शाळांना मिळालेली उन्हाळी सुट्टी 27 मेपर्यंत असून  28 पासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. ब्लॉक रिसोर्स पर्सन (बीआरसी), सेंट्रल रिसोर्स पर्सन (सीआरपी), स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा सुधारणा समिती पदाधिकारी, संघ-संस्थांचे नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

सरकारी शाळेत विविध मोफत सुविध उपलब्ध आहेत. त्याविषयीची माहिती आंदोलन अंतर्गत घरोघरी जाऊन देण्यात येत आहे. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मोफत बूट, पायमोजे, माध्यान्ह आहार, दूध, प्रोटीन गोळ्या, दर शनिवारी नो बॅग डे, अनुसूचित जाती, जमाती व इतर वर्गातील मुलांना शिष्यवेतन, मोफत कर्नाटक दर्शन सहल, अनुभवी शिक्षकांकडून अध्यापन यासह अनेक योजनांचा लाभ सरकारी शाळेतील मुले घेत आहेत. याची जागृती अधिकारी करत आहेत.

शाळाबाह्य मुलांसाठी उपाययोजना गरजेची 

घरच्या गरिबीमुळे अनेक मुलांवर शाळा सोडून कामावर जाण्याची वेळ येते. संघ, संस्थांच्या मदतीने अशा मुलांना मदत देऊन पुन्हा शाळेत पाठवता येते. किमान शिक्षणापर्यंत त्यांच्यावर पुन्हा कामाला जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा सक्‍तीच्या शिक्षणाचा सरकारचा उद्देश यशस्वी होणे अशक्य आहे.