Fri, Apr 26, 2019 17:37होमपेज › Belgaon › शून्य-2-शून्य-2-शून्यातूनच भरारी

शून्य-2-शून्य-2-शून्यातूनच भरारी

Published On: May 19 2018 1:30AM | Last Updated: May 18 2018 10:26PMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीला विधानसभा निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले. तीनपैकी एकही उमेदवार विजयी होवू शकले नाहीत. एकेकाळी सीमाभागावर अधिराज्य गाजवणार्‍या म. ए. समितीच्या यशाला ग्रहण कशामुळे लागले आहे, हा मुद्दा सध्या गाजत असून बेकीची कीड समूळ नष्ट करण्याची मागणी होत आहे. म. ए. समितीच्या यशाची स्थिती 0-2-0-2-0 झाली आहे.

म. ए. समितीला अपशय नवे नाही. यापूर्वीही समितीने अनेकवेळा अपयश पचविले आहेत. मात्र यावेळी विजयाने दिलेली हुलकावणी भविष्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. यापुढे समितीला सावरण्यासाठी नव्या ऊर्जेची आणि निर्धाराची आवश्यकता आहे.

समितीला पराभवाची झटका पहिल्यांदा 1999 साली बसला. त्यावेळी तत्कालिन उचगाव, खानापूर आणि बेळगाव विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी समाधानाची इतकीच गोष्ट की खानापूर येथून म. ए. समितीचे बंडखोर उमेदवार अशोक पाटील निवडून आले. त्यावेळी माजी आ. बी. आय. पाटील, मालोजी अष्टेकर, प्रभू हे उमेदवार पराभूत झाले.  त्यानंतर 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत उचगाव आणि खानापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ म. ए. समितीने खेचून आणले. यावेळी मनोहर किणेकर व दिगंबर पाटील विजयी झाले. शहरातील जागा गमवावी लागली.

त्यानंतर 2008 साली मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर पुन्हा एकदा अपयशाला म. ए. समितीला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर बेकीचा फटका बसला. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण आणि खानापूर मतदारसंघात अरविंद पाटील व संभाजी पाटील विजयी झाले. तर ग्रामीणमध्ये अपयश आले. याठिकाणी किणेकर यांचा 1335 मतांनी निसटता पराभव 
झाला.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत म. ए. समितीचे तिन्ही उमेदवार पराभूत झाले. विशेष म्हणजे सार्‍याच उमेदवारांच्या मतामध्ये कमालीची घट झाली आहे. बंडखोर गटांने घातलेल्या धुमाकुळामुळे अधिकृत उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.

यश-अपयश हा यशाअपयाशाचा खेळ सुरूच राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी म. ए. समितीला पुन्हा एकदा कंबर कसून उभे राहण्याची गरज आहे. मराठी मतदार अधिक संख्येने राष्ट्रीय पक्षांशी जुळवून घेत असल्याचे दिसून येत आहे. हे धोकादायक आहे. राष्ट्रीय पक्षांनी मराठी मतदारांना पद, पैसा आणि खोटी आश्‍वासने भरमसाठ प्रमाणात देत आहेत. यातून मराठी संस्कृती धोक्यात येण्याचा धोका आहे. यामुळे सावध राहून नेत्यांना मराठी मतदारांना एकत्र करावे लागणार आहे. बेकीमुळे जनतेपर्यंत पोहोचणारा नकारात्मक अभिप्राय जनतेपर्यंत पोहोचत आहे. यासाठी सावध होण्याची वेळ येवून ठेपली आहे. यासाठी सीमाभागातील मराठी मतदारांनी सावध राहावे लागणार आहे.?