Mon, Mar 18, 2019 19:23होमपेज › Belgaon › संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्तात वाढ

संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्तात वाढ

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 18 2018 12:38AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी संवेदनशील भागात समाजकंटकांनी जातीय दंगल घडवून आणली होती. तेव्हापासून आजतागायत संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त कायम आहे.विधानसभा निवडणूक निकालादिवशी संवेदनशील भागात पोलिसांबरोबर सीमासुरक्षा दलाने पथसंचलन केले होते. तरीदेखील फोर्ट रोडला समाजकंटकांनी दगडफेक करुन शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. या भागात सीसीटीव्ही कॅमेर्‍याची करडी नजर असून समाजकंटकावर पोलिस बारीक लक्ष ठेवून आहेत.

बेळगावात संवेनशील भागात जातीय दंगल घडवून दहशत माजविण्याचा प्रकार वाढीस लागला आहे.  कोणत्याही क्षणी शुल्लक कारणावरुन  दगडफेक, वाहने पेटविणे, जाळपोळ करणे असे प्रकार वारंवार वाढत आहेत. याची दखल घेऊन संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. खडक गल्ली, जालगार गल्ली व चव्हाट गल्ली, चांदू गल्ली, घी गल्ली, कोतवाल गल्ली, दरबार गल्ली, शेट्टी गल्लीच्या कोपर्‍यावर रात्रीच्यावेळी पोलिसकुमक वाढविण्यात आली आहे. डिसेंबर व फेब्रुवारी महिन्यात संवेदनशील भागात समाजकंटकांनी दंगल घडवून आणली. तेव्हापासून या भागात पोलिस बंदोबस्त कायम आहे. रोज रात्री खडक गल्ली व जालगार गल्लीच्या कोपर्‍यावर पोलिस व्हॅन थांबविण्यात येत आहे.

निवडणूक निकालानंतर कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत असताना फोर्ट रोड येथे दगडफेक झाली. यामध्ये दुचाकी, रिक्षाचे नुकसान समाजकंटकांनी केले. संवेदनशील भागात गुरूवारी सकाळपासूनच पोलिस कुमक वाढविण्यात आली होती. खडक गल्ली व जालगार गल्लीत बॅरिकेडस उभारण्यात आले आहेत. या गल्लीच्या कोपर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची करडी नजर असून छायादर्शन हॉटेलच्या समोर पोलिस चौकीदेखील उभारण्यात आली आहे. नेहमीच पोलिसांची गस्त, बंदोबस्ताच्या नावाखाली चौकशी यामुळे संवेदनशील भागात नागरिक कायम भीतीच्या छायेत वावरत आहेत.