Mon, Aug 19, 2019 01:33होमपेज › Belgaon › सरकार बदलले, शिक्षक बदलीचे काय?

सरकार बदलले, शिक्षक बदलीचे काय?

Published On: May 19 2018 1:30AM | Last Updated: May 18 2018 10:17PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र, त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने बदल्यांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे बदल्यांसाठी इच्छुक असणार्‍या 77 हजार शिक्षकांची निराशा झाली आहे.

गत शैक्षणिक वर्षअखेर शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. पण, अंतिम क्षणी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता निवडणूक झाली तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. दुसरीकडे 8 जूनला म्हैसूर, बंगळूर, गुलबर्गा विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात विधान परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुका शिक्षकांशी संबंधित असल्याने बदल्यांच्या प्रक्रियेला आणखी विलंब होणार आहे.

सध्या भाजपने सत्ता स्थापन केली तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि इतर राजकीय घडामोडी पार पडून स्थिर सरकार अस्तित्वात येईपर्यंत सुमारे महिन्याचा काळ लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच आगामी शैक्षणिक वर्षारंभ होणार आहे. विधान परिषद निवडणूक मत मोजणी 12 जूनला संपणार असून त्यानंतरच शिक्षक बदली प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. सध्या केवळ बदल्यांचे कौन्सिलिंग राहिले असून त्यासंबंधीचे वेळापत्रक जाहीर करावयाचे आहे. पण, सद्यस्थितीत ते शक्य नाही.

बदलीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले तरी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्याचा कालावधी लागेल. बदली झालेल्या शिक्षकांना नव्या ठिकाणी रूजू होण्यासाठी अर्धे शैक्षणिक वर्ष संपणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे निश्‍चित आहे. गतवर्षी दसरा काळात अतिरिक्त शिक्षक बदल्यांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. यंदाही शिक्षकांची निराशा होण्याची शक्यता आहे.

नव्या नियमांबाबत नाराजी

मागील काँग्रेस सरकारने जारी केलेल्या बदलीसंबंधीच्या नव्या नियमाला शिक्षकांनी विरोध केला होता. नव्या नियमामुळे शहरात दहा वर्षे सेवा बजावलेल्यांना सक्तीने ग्रामीण भागात जावे लागणार होते. नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आधीच्या सरकारचे नियम मान्य करेलच असे नाही. पण, त्यामध्ये आणखी कठोर नियम करण्यात आले तर शिक्षकांसमोर अडचण निर्माण होणार आहे.