Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Belgaon › अटलजींनी स्वतः पुसली सफरचंदे

अटलजींनी स्वतः पुसली सफरचंदे

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 16 2018 11:27PMबेळगाव : सुनील आपटे

स्वयंप्रकाशित नेता अटल बिहारी वाजपेयी यांचे बेळगावशी विशेष ऋणानुबंध होते. दक्षिण भारतातील जनसंघाची सुरवात बेळगावातूनच झाली. भाजपचा प्रवेशही येथूनच नंतर राज्य आणि दक्षिणेत झाला. बी. एस. येडियुराप्पा  यांच्या नेतृत्वाखालील भाजपने राज्यात सत्ता स्थापन करून दक्षिण दिग्विजय नोंदवला. याचे श्रेयही अटलजी यांच्या वारंवारच्या बेळगाव भेटीला द्यावे लागेल. जनसंघाची स्थापना करणार्‍यांमध्ये अटलजी एक होते. त्यावेळेपासून त्यांनी बेळगावला अनेकदा भेट दिली होती.

सुमारे 1960-61 ची गोष्ट असावी. रा. स्व. संघाच्या एका बैठकीसाठी ते आले होते. बैठकीला 60 - 70 स्वयंसेवक आले होते.  प्रारंभी सर्व स्वयंसेवकांनी आपापला परिचय करून दिला. आश्‍चर्य म्हणजे, अटलजींनी ती सर्व नावे क्रमाने जशीच्या तशी सांगितली. आम्हाला अचंबा वाटला. अटलजींची स्मरणशक्ती किती तीव्र होती, याचा प्रत्यय आला, अशी आठवण ज्येष्ठ स्वयंसेवक अशोक भंडारी यांनी ‘पुढारी’कडे सांगितली.

मुंबईमार्गे बंगळूरला जाणापूर्वी अटलजी बेळगावात आले होते. ते रेल्वेने प्रवास करत होते. बेळगाव स्टेशनवर रेल्वे थांबली. त्यावेळी त्यांचे लक्ष फलाटावर लावलेल्या एक इंग्रजी वृत्तपत्राकडे गेले. त्यावर सॉमरसेट नावाच्या एका विव्दानाचा फोटो पहिल्या पानावर प्रसिध्द झालेला होता. तो पाहताच अटलजी रेल्वेतून उतरले. त्या वृत्तपत्र विक्रेत्याला म्हणाले,  ‘पहले पेजपर सॉमरसेट का फोटो है ना? कुछ महिने पहले मैं विदेश गया था। तब मेरी सॉमरसेटशी मुलाकात हुई थी. शायद चल बसा होगा.’ आणि खरोखरच सॉमरसेटच्या निधानचे ते वृत्त होते. अगदी दूरवरून टिपणारी अटलजींची नजर अशी भेदक होती.

कर्नाटकाचे बुलंद नेते जगन्नाथराव जोशी यांच्याबरोबर त्यांचे स्नेहबंध होते. जोशी यांचा मुक्काम बर्‍याचदा बेळगावात असे. यामुळेही अटलजींचे बेळगाव आवडते शहर बनले होते. बेळगावात आल्यानंतर त्यांची भेट असायची ती आप्पासाहेब मुतगेकर यांच्या वडगावातील घरी. अनेक विषयांवर त्यांच्या गप्पा व्हायच्या. त्यांच्या आवडीचे भोजन म्हणजे पिठले आणि भाकरी. 

गोव्याहून ते विमानाने बेळगावला यायचे. त्यावेळी त्यांना आणण्यासाठी आप्पासाहेब गोव्याला गेले होते. पांढरी शुभ्र कॉन्टेसा कार होती. अटलजी गोव्याला आल्यानंतर त्यांचा बेळगाव प्रवास सुरू झाला. वाटेत खाण्यासाठी आप्पासाहेबांनी सफरचंदे नेली होती. वाटेत त्यांनी चालकाला कार थांबवण्यास सांगितले. 

आप्पासाहेबांनी सफरचंद धुण्यासाठी पाणी घेतले. इतक्यात अटलजीनी विचारले, ‘अरे आप क्या कर रहे हैं.’ यावर आप्पासाहेब म्हणाले. ‘सफरचंद है, धो रहा हूँ.’ यावर अटलजींनी त्यांच्याकडची सफरचंदे घेतली आणि नेसलेल्या धोतराने ती पुसली आणि खाऊन टाकली. आपल्यामुळे कुणाला त्रास नको ही वृत्ती आणि साधेपणा हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. टिळकवाडीतील श्रीकांत वेर्णेकर यांच्या घरीही अटलजींनी भेट दिलेली आहे. या आठवणीला अलका एम. चौगले यांनी उजाळा दिला.