Sun, Mar 24, 2019 06:35होमपेज › Belgaon › बाजूपट्ट्या खचल्या, अपघात वाढले

बाजूपट्ट्या खचल्या, अपघात वाढले

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:12PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसांत बेळगाव जिल्ह्यातील राज्यमार्गावर झालेल्या अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे.जोडरस्त्यांच्या बाजूपट्ट्या खचल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली असल्याचा निष्कर्ष जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. 

राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगाव ओळखला जातो. त्याशिवाय कर्नाटक सरकारने दुसरी राजधानी म्हणून बेळगावला पसंती दिली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या या जिल्ह्यात सर्व राज्यांतून रोज हजारो वाहने धावत असतात.  राज्य महामार्गांची रुंदी कमी असल्याने एकमेकांसमोर वाहन येताच पादचार्‍यांनाही रस्त्यापासून तीन फूट दूर जावे लागते. यामध्ये बर्‍याच रस्त्यांच्या बाजूपट्ट्या अर्ध्या फुटाने खचल्या आहेत. रात्रीच्या वेळेस समोरुन येणार्‍या वाहनाचा अंदाज घेत वाहन रस्त्याच्या बाजूला घेताना अपघात होत आहेत. 

बेळगावपासून खानापूरपर्यंतच्या या राज्यमार्गाची अवस्था अत्यंत दयनीय होती. 2016 च्या दरम्यान या रस्त्याचे रुंदीकरण आणी डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता सुस्थितीत असला तरी पिरनवाडीपासून झाडशहापूरपर्यंतच्या रस्त्यावर  चरी पडल्या आहेत. दुचाकीस्वार पडून जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची मोठी वर्दळ आहे. बाजूपट्ट्या खचल्याने वाहने रस्ता सोडून बाहेर जाऊन अपघात होत आहेत. 

खानापूरपासून पुढे लोंढा-रामनगरवरून पुढे कारवारला हा रस्ता जोडला जातो. या रस्त्यावर दुतर्फा जंगल असून ठिकठिकाणी जीवघेणी वळणे असल्याने 14 कि. मी. च्या रस्त्यावर वरचेवर अपघात घडत असतात. खानापूरपासून धारवाड-हल्याळ - हुबळी या रस्त्याची 2007 साली चांगल्या पध्दतीने सुधारणा झाली होती. मात्र रुंदी कमी व बाजूपट्ट्या पूर्णतः निकामी झाल्याने या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. 

शहराच्या पश्‍चिमेला चंदगड तालुक्याला जोडणारा रस्ताही बाजूपट्ट्यांनी ग्रासला आहे.  बेळगाव-जांबोटी व्हाया पणजी राज्यमार्ग सुस्थितीत असला तरी बाजूपट्ट्या व माहिती फलकांच्या अभावामुळे अपघातग्रस्त बनत चालला आहे. सुसाट धावणारी वाहने व नागमोडी वळणांमुळे हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. हुक्केरी, चिकोडी, निपाणी, अथणी आदी शहरांना बेळगावमधून जाणार्‍या रस्त्यांच्या बाजूपट्ट्याच कूचकामी झालेल्या दिसत आहेत.

राज्यमार्गांची सुधारणा झालेली असली तरी रस्त्यावर पडलेले खड्डे व चरी बुजविणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर राज्य मार्गावरील बाजूपट्ट्यांवर मुरूम टाकून रस्ते सुस्थितीत करण्याची गरज आहे. रात्रीच्यावेळी अरुंद रस्त्यावर समोरील वाहनाचा अंदाज चुकून वाहने रस्त्याबाहेर जातात.  जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी याचा गंभीर विचार करावा. बाजूपट्ट्या व रस्ते दुरुस्ती लवकर न झाल्यास अपघातातील बळींची संख्या वाढण्याचा धोका आहे.
- ईश्‍वर जोरापूरे, वाहनचालक

निधी मंजूर, मात्र दुरूस्ती नाही
वर्षातून दोनवेळा राज्य महामार्गावरील बाजूपट्ट्या दुरुस्त करण्यासाठी शासन निधी मंजूर होत असतो. जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्याच्या बाजूपट्ट्या दुरुस्त केल्या गेलेल्या दिसत नाहीत. पावसाळा संपल्यानंतर बाजूपट्ट्या दुरुस्त करण्यासंबंधी कार्यवाही सुरू झालेली नाही. खचलेल्या बाजूपट्ट्यांच्या रस्त्यांवर वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन हाकण्याची वेळ आली आहे.