Wed, Jul 17, 2019 00:06होमपेज › Belgaon › स्मार्टसिटीत होणार गो-शाळा

स्मार्टसिटीत होणार गो-शाळा

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 8:52PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांची वर्दळ तापदायक ठरली आहे. मोकाट जनावरांमुळे अपघात घडत आहेत. याकडे लक्ष देऊन बेळगाव महापालिकेने स्मार्टसिटी योजनेंतर्गत गो-शाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गो-शाळेसाठी 64 लाख 28 हजार रु. निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या स्मार्टसिटी योजनेत रस्ते, दळणवळण, रहदारी यावरही भर देण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे रहदारीला अडथळा आणि अपघाताला निमंत्रण देत आहेत. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला वारंवार कसरत करावी लागते. यातच अनेकवेळा वाहतूक पोलिसांवरही रस्त्यात बसणार्‍या जनावरांना हाकलण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. 

स्मार्टसिटी योजनेत वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाकडून महापालिकेला वाहुकीसंदर्भात विविध सूचना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मोकाट जनावरांचीही नोंद आहे. मोकाट जनावरांच्या कायमच्या बंदोबस्तासाठी मनपाकडे ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे स्मार्टसिटी योजनेंतर्गत गो-शाळा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेला सुरुवात रस्त्यावर हिंडणार्‍या मोकाट जनावरांविरोधात कारवाई केल्यानंतर त्यांची रवानगी मनपाच्या नियोजित गो-शाळेत करण्यात येईल. मनपाच्या गो-शाळेसाठी राष्ट्रीय महामार्गावर जागा संपादित केली जाणार आहे. गो-शाळेसाठी एकूण 64 लाख 28 हजार 589 रु. खर्च होणार आहे. गो-शाळा बांधण्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर ठेकेदाराला 6 महिन्याच्या आत गो-शाळेचे काम पूर्ण करावे लागणार आहे.