Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Belgaon › समिती-व्यापारी वादात 50 कोटी डावावर! 

समिती-व्यापारी वादात 50 कोटी डावावर! 

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:15AMबेळगाव : प्रतिनिधी

किल्ला परिसरातील भाजी व्यापार्‍यांनी एकत्रित येऊन स्वमालकीचा दहा एकरमध्ये भाजी बाजार उभारला असतानाच त्यांच्याचसाठी बाजार समितीने आधुनिक पध्दतीचा बाजार उभारला आहे. लवकरच निविदा काढून गाळे वाटप करणार आहेत. बाजार समिती आणि भाजी व्यापार्‍यांतील या वादामुळे आता सुमारे 50 कोटी डावावर लागले आहेत. हा भुर्दंड कोणाला बसणार, हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

भाजी विक्रेत्यांनी 28 वषार्ंपासून किल्ला परिसरातील कॉन्टोन्मेंट बोर्डच्या जागेत भाजी बाजार सुरु केला आहे. ही जागा त्यांना अपुरी पडत आहे. येथील असुविधांमुळे भाजी व्यापार्‍यांनी महामार्गाजवळ सुमारे साडेदहा एकर जागा घेऊन सर्व त्या सुविधांसह मार्केट उभारले आहे. यासाठी 50 कोटी खर्चून तीनशे गाळे उभारण्यात येत आहेत. यासाठी आतापर्यंत 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या जागेसाठी महापालिकेसह इतर परवाने  न मिळाल्याने याचे पुढील बांधकाम सहा महिन्यापासून थांबवण्यात आले आहे.
दुसरीकडे बाजार समितीने भाजी व्यापार्‍यासाठी 70 कोटीचा प्रकल्प आणला आहे. बाजार समितीमध्ये त्यांच्याकडून आता 132 गाळे बांधून तयार आहेत. यावर 22 कोटी खर्च करण्यात आले असून एकूण 181 गाळे बांधण्यात येणार आहेत. दोन महिन्यात निविदा काढून गाळे व्यापार्‍यांना देण्यात येतील. तीन हजार रु. महिन्याला भाडे आकरले जाण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि बाजार समितीच्या दोन्हीही इमारती पूर्णत्वाच्या मार्गावर असताना कोणती इमारत भाजी मार्केट म्हणून राहणार, हा प्रश्‍नच आहे.
व्यापार्‍यांच्या मते  बाजार समितीकडे तीनशे गाळे बांधण्याची मागणी केली असताना त्यांनी केवळ 130 बांधले आहेत. यामुळे आम्ही स्वमालकीची इमारत उभारली. आता राजकारण करून इतर परवान्यांसाठी टाळाटाळ केली जात आहे. बाजार समितीच्या नियंत्रणाखाली आम्ही काम करण्यास तयार असून येथेच भाजी मार्केटला परवानगी द्यावी, अशी व्यापार्‍यांची मागणी आहे.

वाद काय आहे....
काही वर्षापूर्वी बाजार समितीने व्यापार्‍यांना एपीएमसी मार्केटमध्ये  मार्केट उभारण्याचे अश्‍वासन दिले. समितीने 132 गाळेही उभारले. मात्र व्यापार्‍यांची मागणी आहे ती तीनशे गाळ्यांची. भविष्यात टप्प्याटप्प्याने इतके गाळे बांधून देण्याचे समितीने मान्य केले. मात्र व्यापार्‍यांच्या मते एकाच वेळी सर्व गाळे बांधा आणि मग मार्केटचे स्थलांतर करा. यामध्ये वाद निर्माण झाल्याने व्यापार्‍यांनी वर्गणी काढून साडेदहा एकर जागा घेऊन मार्केट उभारण्यास प्रारंभही केला. ही जागा आता हिरव्या पट्ट्यात येत असल्यामुळे आणि कोणाचेही सहकार्य मिळत नसल्यामुळे बांधकामसह सर्व परवाने त्यांना मिळाले नाहीत.