Sun, May 26, 2019 20:53होमपेज › Belgaon › ‘मराठी’ची गळचेपी शिगेला

‘मराठी’ची गळचेपी शिगेला

Published On: Jan 30 2018 11:14PM | Last Updated: Jan 30 2018 11:14PMबेळगाव : प्रतिनिधी

जि. पं. च्या विकास आढावा बैठकीत आमदार, सदस्य आणि जिल्हाधिकारी यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे सीमाभागात गोंधळ माजला असून मराठीचा मुद्दा शिगेला पोहचला आहे. भाषिक अल्पसंख्याक कायदा पायदळी तुडविणार्‍या प्रशासनाची मुजोरी भूमिका जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी वठविली. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या मराठी भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांकडून मराठीतून कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे; परंतु त्याकडे प्रशासनाने डोळेझाक चालविली आहे. याउलट कानडीकरणाचा वरवंटा जोमाने सुरू आहे. भाषिक अल्पसंख्याकांसाठी असणारा  राज्याचा कायदा धाब्यावर बसविण्यात येत आहे.

खानापूरचे आ. अरविंद पाटील यांनी सभागृहात मराठीतून आपल्या मागण्या मांडण्यास सुरुवात केली. त्याला आक्षेप घेत जिल्हाधिकारी व जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कानडीतून बोलण्यास सूचविले. त्यामुळे आ. पाटील यांनी हिंदीतून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला.  

जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा दंडाधिकारी असतो. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या हिताची जोपासना आणि अधिकाराचे संरक्षण करण्याची त्याची जबाबदारी असते. त्यांनीच हक्‍क डावलण्याचा प्रकार केला आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मराठी भाषिकांमध्ये संताप पसरला आहे.  

त्याचबरोबर मराठी भाषिक असलेले जि. पं. सदस्य मोहन मोरे यांनीही ‘आम्ही महाराष्ट्रात जाणार नाही. कर्नाटकातच राहणार आहे. परंतु, आम्ही मराठी भाषिक आहोत. त्यामुळे मराठीतून कागदपत्रे पुरवावीत. आमच्यावर अन्याय कशासाठी?’ असे वक्‍तव्य केले. त्यामुळे वादात भर पडली. 

कायदा असा आहे?

भाषिक अल्पसंख्याक  नियमांनुसार ठराविक भागांत 15 टक्क्यांहून अधिक संख्येने विशिष्ट भाषा बोलणारे लोक राहत असतील, तर त्यांना त्यांच्या भाषेत कागदपत्रे पुरविली गेली पाहिजेत. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिक 22 टक्क्यांहून अधिक, तर बेळगाव, खानापूर, चिकोडी, हुक्केरी तालुक्यांत निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या मराठी आहे. त्यामुळे मराठी  भाषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळालीच पाहिजेत.

‘आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असलो तरी मातृभाषा आम्हाला महत्त्वाची आहे. मराठीतून कागदपत्रे मिळावीत आणि हा भाग महाराष्ट्रात जावा ही आमची इच्छा आहे.’
- रमेश गोरल, काँग्रेस, जि. पं. सदस्य