Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Belgaon › आंदोलने शेकडो, दखल केवळ डॉक्टरांची

आंदोलने शेकडो, दखल केवळ डॉक्टरांची

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सुवर्ण विधानसौध परिसरात विविध संघटनांकडून अनेक आंदोलने झाली तरी सरकारने कोणत्याच आंदोलनाची दखल घेतली नाही. केवळ डॉक्टरांच्या आंदोलनाची दखल घेऊन इतर आंदोलकांच्या तोंडाला आश्‍वासनांची पाने पुसण्याचा प्रकार झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. 

राज्यातील मराठा आरक्षण, विनाअनुदानित  शाळांमधील शिक्षक, धनगर समाज, दिव्यांग,  विशेष शिक्षण विभागाचे शिक्षक, हडपद समाज बांधव, कम्युनिस्ट पक्ष, बांधकाम  कामगार, संगीत शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक, वसतिशाळा कर्मचारी आदी संघटनांनी मोर्चे काढून निवेदने सादर केली. यावर विचार होणार का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.  

येथील सुवर्ण सौध मध्ये    सरकारचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. या अधिवेशनादरम्यान सरकारने आपल्या मागण्यांवर सभागृहात चर्चा करुन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत अनेक संघटनांनी निदर्शने केली. यावेळी सरकारचे प्रतिनिधीत्व करणार्‍या काही नेत्यांनी आंदोलकांच्या भेटी  घेऊन निवेदन स्वीकारले. काही आंदोलकांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. या आश्‍वासनांची पूर्तता होणार  का, हा संशोधनाचा आहे.

पिकाला हमीभाव देण्यात यावा, ऊस गाळपापूर्वी कारखान्यांनी दर जाहीर करावा, उतार्‍यानुसार भाव ठरवण्यात यावा, अशा मागण्या करत ऊस उत्पादकांनी अनेकवेळा आंदोलन करुन आपली मागणी लावून धरली आहे. मात्र, सरकारने यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही. यामुळे या अधिवेशन काळात सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी आंदोलन केले असले तरी याची कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे. 

राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांनी 1995 नंतरच्या शाळांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, यावरही अधिवेशनात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरुन सभागृहात साधी चर्चादेखील करण्यात आलेली नाही.  

राज्यातील मराठा समाजाला सरकारच्या सेवा सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. यासाठी मराठा समाजाचा 2 अ प्रवर्गात  समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, यावर ही कोणतीच ठोस चर्चा झाली नाही. 

धनगर समाजाने आपला एसटी जातीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करुन आंदोलन केले. नेत्यांनी लक्ष दिले नसल्याने धनगरांनी मेंढरांसह सुवर्ण सौध परिसरात  घुसण्याचा प्रयत्न केला. यावरुन सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली होती.