Thu, Jun 20, 2019 21:53होमपेज › Belgaon › मुख्यमंत्र्यांना हवे जिल्ह्याचे विभाजन

मुख्यमंत्र्यांना हवे जिल्ह्याचे विभाजन

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:31AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

प्रभावी प्रशासन व सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करावेच लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. 
बेळगाव येथील सुवर्णसौधमील हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. बेळगाव जिल्हा विस्ताराने राज्यातील सर्वात मोठा आहे. नवीन तालुक्याच्या निर्मितीनंतर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुक्यांचा समावेश होणार आहे. निपाणी, मुडलगी, कागवाड या तीन नवीन तालुक्यांची भर पडलेली आहे. परंतु अनेक कन्नड संघटनांनी जिल्ह्यातील कन्नड भाषकांचे वर्चस्व विभाजनामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने प्रशासकीय कामकाजासाठी अथणी तालुक्यातील नागरिकांना बेळगाव जिल्हा केंद्र 160 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे.

ख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार व खा. प्रकाश हुक्केरी यांच्या म्हणण्यानुसार मार्च 2018 पूर्वी चिकोडी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा सरकार करणार आहे. चिकोडीप्रमाणेच गोकाकलाही स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळविण्यासाठी तेथील नागरिक 1996 पासून प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आंदोलनही करत आहेत. गोकाक जिल्हा चालना समितीने गोकाक बारअसोसिएशनच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यासाठी 21 डिसेंबरला मुख्यमंत्री बेळगावच्या दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी त्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी गोकाक बंदचा आदेशही बजाविण्यात आला आहे. या विषयावर जारकीहोळी बंधूंनीही प्रयत्न चालूच ठेवले आहेत. 

चिकोडीच्या दृष्टीने त्या ठिकाणी अनेक जिल्हापातळीवरील सरकारी कार्यालये आहेत. शिवाय चिकोडी हा शैक्षणिकदृष्ट्या स्वतंत्र जिल्हा म्हणून ओळखला जातो. चिकोडीसाठी स्वतंत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय, विविध न्यायालये, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. पं. कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खाते, कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय या कारणास्तव प्रथम चिकोडी हा स्वतंत्र जिल्हा म्हणून सरकार घोषणा करायच्या तयारीत आहे. मुख्यमंत्र्यांनीही बेळगाव जिल्ह्याचे दोन किंवा तीन जिल्ह्यात विभाजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व कारणांमुळे लवकरच चिकोडी स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा झाली तर आश्‍चर्य वाटू नये.