Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › उपमहापौरांचा भाग चकाचक, समस्या कायम

उपमहापौरांचा भाग चकाचक, समस्या कायम

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 02 2018 10:45PMबेळगाव : प्रतिनिधी

 वॉर्ड 13 उपमहापौरांचा. वॉर्डात 24 तास पाणी योजना राबवावी, अशी मागणी आहे. मात्र सहा दिवसातून एकदा पाणी येते. दररोज कचर्‍याची उचल होऊन सुध्दा काही ठिकाणी ढीग पाहावयास मिळतात. रस्ते उंच व गटारी खोल, अशी अवस्था झाली असून गटारी विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. चार कोटीची विकास कामे राबविली आहेत. अजून दीड कोटीची कामे पावसाळ्यानंतर राबविण्यात येणार आहेत. तरीही नागरी समस्या निकालात काढण्यात उपमहापौरांना संपूर्ण यश आलेले नाही.

या वॉर्डात 7500 मतदार आहेत. यंदा नव्याने 1000 मतदारांची भर पडली आहे. पाणी समस्या निकलात काढण्यासाठी सात ठिकाणी कूपनलिका खोदल्या आहेत. प्रदूषण होऊ नये म्हणून 25 लाख खर्च करुन विसर्जन तलाव उभारण्यात आला आहे. शिवाय पेव्हर्स बसविण्यासाठी 5 लाख खर्च केले आहेत. वॉर्डात 24 तास पाणी योजना नाही. मात्र आवश्यक ठिकाणी जलकुंभ बसवून जलपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. 

संपूर्ण नागरी समस्या निकालात काढण्यासाठी उपमहापौरांना यश आलेले नाही, असा तेथील नागरिकांचा दावा आहे. स्वच्छ...सुंदर बेळगाव करण्याचा नारा दिला जातो. मात्र या भागातील नागरिकांना कचरा कचरावाहू गाडीतच टाका, तो रस्त्यावर अथवा गटारीत टाकू नका, असे आवाहन करुनदेखील ते कचरा पुन्हा तेथेच टाकतात. त्यामुळे ठरावीक गल्लीच्या कोपर्‍यावर कचरा पडल्याचे चित्र पाहावयास मिळते. 

मरगाई गल्ली सर्वात लांब म्हणून वॉर्डात ओळखली जाते. त्या भागात राहणार्‍या लोकांची घरेदेखील रेल्वेच्या डब्याप्रमाणे आहेत. त्यासाठी तेथील नागरिकांच्या सहकार्याने 15 फुटाचा रस्ता काँक्रीट केला आहे.  रथ गल्लीतील ड्रेनेज समस्या तेथील रयतेच्या मदतीने पूर्ण केली आहे. चुकीच्या पध्दतीने ड्रेनेजची जोडणी केल्याने उलटा प्रवाह येऊन वारंवार चेंबर ब्लॉक होत होते. ती समस्या कायमची निकालात काढण्यात आली आहे. कलमेश्वरनगरमधील तलाव जलपर्णीने व्यापला आहे. जलपर्णी बाजूला करुन खोदाई केल्यास वॉर्डाला उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. त्या दृष्टीने विकास करणे गरजेचे आहे. रस्ते चकाचक करुनदेखील अजूनही नागरी समस्या कायम आहेत. अलारवाड - जुने बेळगाव ड्रेनेज लाईन निकालात काढली आहे. मुख्य म्हणजे कचरा समस्या निकालात निघाली तर वॉर्डाची गणना स्मार्ट वॉर्डमध्ये होऊ शकते.

असा आहे वॉर्ड 

जुने बेळगाव नाका, रेणुकानगर (एक बाजू), महादेव नगर, गणेशपेठ गल्ली (एक बाजू), कोरवी गल्ली, रथ गल्ली, हरिजन वाडा, लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, कुलकर्णी गल्ली, मेन रोड, खन्नूरकर गल्ली, कनकदास नगर, कलमेश्वर मंदिर, सुनगार मळा, देवांग नगर क्रॉस 3, देवांगनगर 4, देवांग नगर 5,कलमेश्वर नगर (एक बाजू), धामणे रोड, विष्णू गल्ली कॉर्नर, वझे गल्ली (बीपी), विष्णू गल्ली (बीपी) पर्यंत.पावसाळ्यानंतर ही कामे करणार 

 बस्ती गल्ली, मरगाई गल्ली रस्ता, गणेशपेठ रस्ता, महादेवनगर पालखी मार्ग, सुगार मळा, कलमेश्वर नगर रस्ता येथील सांडपाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न.
नव्याने रस्ते, काँक्रीटीकरण, डांबरीकरण व पेव्हर्स घातल्याने गटारी रस्त्याच्या बाजूला खोलगट भागात आहेत. रस्त्यावरुन  जपून जावे लागते. यावर उपाय म्हणून गटारीची उंची वाढवायला हवी. नाही तर गटारीच्या बाजूने सरंक्षक लोखंडी जाळी बसवायला हवी.