Wed, Jul 17, 2019 08:14होमपेज › Belgaon › चेनस्नॅचिंगला चाप, वाटमारीला ऊत

चेनस्नॅचिंगला चाप, वाटमारीला ऊत

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 10:59PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

काही वर्षात बेळगावच्या गुन्हेगारीने नवे वळण घेतले आहे. सोनसाखळी चोर्‍या व वाटमारीच्या प्रकरणांनी उचल खाल्ली आहे. यात तरुण व अल्पवयीनांचा समावेश सर्वसामान्यांसह पोलिस खात्याला चक्रावून टाकणारा आहे. यादीवर नोंद नसलेल्या नव्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांच्या नाकीनऊ आले आहे. इराणी टोळीच्या कारनाम्यांना चाप बसला असला तरी वाटमारीची  जनतेत दहशत आहे. यावर्षी मार्च महिन्यात एकाच दिवशी व वर्दळीच्या ठिकाणी काही वेळातच वाटमारीच्या दोन घटनांनी बेळगावकर चक्रावले होते. दुकान बंद करून घराकडे निघालेल्या व्यापार्‍याला 
किर्लोस्कर रोड येथील नवग्रह 

मंदिराजवळ डोळ्यात मिरचीपूड टाकून 9 लाख 88 हजारांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याच वेळी मारुती गल्ली येथून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे  मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. फर्लांगभराच्या अंतरात काही वेळात घडलेल्या वाटमारी प्रकरणांचा उलगडा झालेला नाही. ळमारुती पोलिसांनी इराणी टोळीचा छडा लावल्यानंतर सोनसाखळी चोरीचे प्रकार कमी झाले. पोलिसांनी या टोळीबरोबरच स्थानिक चोरट्यांवर नजर ठेवली. याच वेळी शहर उपनगरात वाटमारी प्रकरणांचा आलेख उंचावत  आहे. बेळगावच्या गुन्हेगारी विश्‍वात तरुणांचा सहभाग वाढला आहे.ऐषोआराम,व्यसनाधीन व विलासी जीवनाची ओढ असलेल्या तरुणांचा सोनसाखळी चोरी, वाटमारी प्रकरणात मोठा सहभाग असल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे. यापूर्वी खडेबाजार व अन्य परिसरात घडलेल्या वाटमारींच्या प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.  

  काही वर्षांपूर्वी इंडाल चौकानजीक पोलिसवेशात आलेल्या चोरट्यांनी ट्रक चालकाला धमकावून रोख रक्कम लांबवली. चालक काही अंतरावर गेल्यानंतर पोलिसांनी झडतीच्या नावावर त्याची उलटतपासणी केली. त्यावेळी पोलिस वेशातील चोरट्यांनी गंडवल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले. पोलिस वेशातील चोरट्यांनी ग्रामीण भागात धुमाकूळ घातल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
वाटमारीची बरीच प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहचत नाहीत. मोठ्या रक्कमेची लूट झालेल्या प्रकरणांची ठाण्यात नोंद होते.गळ्यातील सोन्याची चेन,घड्याळ,पैसे गमावलेले बहुसंख्य जण पोलिसांची ब्यादच नको म्हणून तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. यातून वाटमारी करणार्‍यांचे फावते.