Thu, Jun 27, 2019 04:23होमपेज › Belgaon › ‘एक वॉर्ड एक गणपती’ संकल्पना राबवावी

‘एक वॉर्ड एक गणपती’ संकल्पना राबवावी

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 02 2018 10:26PMबेळगाव : प्रतिनिधी

शहराच्या  लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, तशी सार्वजनिक मंडळेही प्रत्येक वर्षी वाढत चालली आहेत. मंडळांची संख्या सुमारे 375 असून प्रतिवर्षी यात वाढच होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात घरोघरी पूजन केले जाणार्‍या गणपतीला सार्वजनिक स्वरुप मिळवून दिले ते लोकमान्य टिळकांनी. परकियांच्या दास्यात असलेल्या भारताला मुक्त करण्यासाठी प्रेरणा मिळावी, स्वराज्य स्थापनेसाठी प्रत्येक भारतीयात आस निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने लोकमान्यांनी गणेशोत्सव, शिवजयंतीसारख्या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप दिले.  
हा उत्सव सर्वांच्या हातांना काम मिळवून देणारा, अर्थार्जन होणारा असल्याने कालांतराने उत्सवाची व्याप्ती वाढली. तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस असे उत्सवाचे दिवस वाढत गेले. पुढे तो 11 दिवस साजरा होऊ लागला. सार्वजनिक गणेश मंडळे 11 दिवस उत्सव साजरा करतात. 

 एखादे गाव लहान असले तरी तेथील  गणेश मंडळे अनेक असतात. प्रत्येक गल्लीत एक याप्रमाणे एखाद्या गावात 10 गल्ल्या असल्या तर तेथे सार्वजनिक दहा गणपती हमखास दिसून येतात. ‘हौसेला मोल नाही’ या उक्तीप्रमाणे तरुणाई हौसेने सार्वजनिक गणपती बसवितात. वर्गणी जमवितात. श्रींची मूर्ती बनवून घेण्यापासून मंडपाची सजावट,  श्रींचे आगमन, वाद्यपथके, फटाके, विसर्जन मिरवणूक यासाठी वारेमाप पैसा खर्च करतात.

 आजच्या महागाईच्या दिवसांत इतका पैसा खर्च करणे हे योग्य होईल का, याचा विचार सार्वजनिक मंडळांनी करायला हवा. वर्गणीरूपात जमविलेला पैसा उत्सवासाठी माफक  करून उर्वरित पैसा गोरगरीब कुटुंबातील मुलांचे शिक्षण, अनाथाश्रम, वृध्दाश्रम, पूरग्रस्त यांच्यासाठी उपयोगात आणल्यास पैसा सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल. उत्सवासाठी येणार्‍या खर्चावर मर्यादा आणण्यासाठी एक गाव/ एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना योग्य ठरेल. 

गावातील, शहर पातळीवरील युवक मंडळांनी एकत्र येऊन  गावामध्ये, आपल्या वॉर्डामध्ये एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचा निर्णय घेतला पाहिजे.शहरांमधून आज प्रत्येक वॉर्डात  4 ते 5 सार्वजनिक गणपती हमखास दिसून येतात. बेळगावचा विचार करता येथे प्रत्येक गल्लीचा सार्वजनिक गणपती दिसून येतो. यावर्षी एखाद्या तरुण मंडळाने सार्वजनिक गणपती बसविला तर त्यांचे पाहून दुसर्‍या वर्षी दुसरे दुसरे तरुण मंडळ सार्वजनिक मंडळ स्थापन करते. 

अशामुळे सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. एकाचे पाहून दुसर्‍याने सार्वजनिक गणपती बसविणे यामागे भक्तीपेक्षा ईर्षाच अधिक दिसून येते. कोणताही सण? उत्सव साजरा करताना तो भक्ती, श्रध्देने साजरा केला पाहिजे. ईर्षा, मत्सर, दिखावूपणा   अशा विकारातून उत्सव साजरा करण्यात काहीच अर्थ नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हे ध्यानात घेतले पाहिजे.