Mon, Jun 17, 2019 18:22होमपेज › Belgaon › गवळ्यांच्या समस्येवर प्रशासनाची धावपळ...

गवळ्यांच्या समस्येवर प्रशासनाची धावपळ...

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 04 2018 11:21PMबेळगाव : प्रतिनिधी

कॅन्टोन्मेंट हद्दीत पूर्वीपासून जनावरांना चारवण्यासाठी नेण्यात येते. त्यावर कधीच बंदी आली नाही. कॅन्टोन्मेंट हद्दीत यापूर्वीदेखील डेअरी फार्म होता. त्यावेळी तेथील गायींना कुरण कमी पडले नाही. आता तेथे असलेल्या 700 गायींच्या कुरणाचा प्रश्‍न पुढे करून बेळगावामधील गवळी बांधवांना जनावरे चारण्यास मज्जाव केला जात असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी कॅन्टोन्मेंट अधिकार्‍यांना जाब विचारला. यावर कॅन्टोन्मेंट सीईओंनी सोमवारी गवळी बांधवांना अंतिम तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे.

गवळी बांधवांच्या जनावरांना चरण्यासाठी जागेबाबत प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांच्या कार्यालयात खासदार सुरेश अंगडी, आमदार अ‍ॅड. अनिल बेनके, आमदार अभय पाटील, कॅन्टोन्मेंट अधिकारी व गवळी बांधव यांच्यात शनिवारी (दि. 4) दुपारी तातडीची बैठक झाली. या बैठकीला पत्रकारांना आमंत्रण नव्हते. यावरून बैठकीत खासदार, आमदार आणि कॅन्टोन्मेंट अधिकार्‍यांत शाब्दिक चकमक झाली. 

मोकळ्या जमिनी धनदांडग्यांनी काबीज केल्या आहेत. राहिलेल्या जमिनीत आलेल्या कुरणावर जनावरांना जगवणे मुश्कील आहे. कुरण विकत घेऊन जनावरे जगविणे परवडण्यासारखे नाही. गोठ्यात जनावरांना बांधून चार्‍याची सोय केली तर त्यांचे आरोग्य बिघडून गवळ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जनावरे मोकळ्या वातावरणात असतील तर त्यांचे आरोग्य उत्तम राहते, असे मत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले.

आयुक्तांच्या कक्षात घेतलेल्या बैैठकीला कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर गोविंद  कलवाड व सीईओ दिव्या शिवराम उपस्थित नसल्याची माहिती मिळाली.

अधिकार्‍यांचा अजब सल्ला
कॅन्टोन्मेंटमध्ये जनावरे बांधून ठेवून पाळली जातात. त्याप्रमाणे बेळगावातील गवळी बांधवांनीही याचे अनुकरण करण्याचा अजब सल्ला अधिकार्‍यांनी दिला. यावर खासदार अंगडी व बेनके यांनी त्यांना धारेवर धरले. 

उद्या तोडगा काढणार
 शनिवारी कॅन्टोन्मेंटच्या सीईओ दिव्या शिवराम आणि गवळी बांधवांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. जमावाने न येता केवळ दोघांना भेटावयास बोलावले. ब्रिटिशकाळापासून कॅन्टोन्मेंट हद्दीत गवळी बांधव आपली जनावरे चारतात. जनावरे आणि गवळ्यांच्या पोटाचा हा प्रश्‍न असून कॅन्टोन्मेंट हद्दीत ठराविक जागेत जनावरे चारण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी गवळी बांधवांनी केली. सोमवार, दि. 6 रोजी पुन्हा यावर चर्चेसाठी बोलावून तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. शहरातील गवळ्यांना जनावरे चारवण्यासाठी ठराविक जागा उपलब्ध आहेत. त्या जागा सर्वांना पुरेशा नाहीत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीत याकरिता परवानगी मिळण्याची शक्यता आहे.