होमपेज › Belgaon › अरगन तलाव सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर 

अरगन तलाव सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर 

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:29AMबेळगाव : प्रतिनिधी

चार महिन्यापूर्वी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील कॅन्टोन्मेंट हद्दीत येणार्‍या अरगन तलावातील गाळ काढून परिसर सुशोभित केला आहे. तलावाचे कठडे उंच करून शेजारी बाकावर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र येथे विरंगुळा केंद्र म्हणून येणार्‍या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तलावाच्या काठावर लोखंडी संरक्षक जाळी उभारावी, अशी मागणी होत आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अरगन तलावातून शहरासह परिसराला पाणी पुरवठा होत होता. मात्र, कालांतराने शहराबाहेरून आलेल्या पाणी योजनामुळे या तलावांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले होते. सध्याच्या स्थितीत या ठिकाणी एकमेकाला लागून चार तलाव आहेत. या पाण्याचा उपयोग पूर्वी जनावरांसाठीही केला जात असे. चार महिन्यापासून पर्यावरणीय दृष्टिकोनातून तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठविण्यात येत आहे. 

या परिसरात विविध प्रदेशातील पक्ष्यांचे आगमन होते. सध्या सुशोभिकरणामुळे परिसर निसर्गरम्य झाला आहे. शेजारी गणपती मंदिर असल्यामुळे दररोज येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. हे भाविक लहान मुलांना घेऊन तलावाच्या कठड्यावर वावरत असतात. येथील बाकावर बैठक व्यवस्था असल्याने लहान मुले नजरचुकीने तलावात पडण्याचा धोका आहे. वेंगुर्ला रोडला लागून तलावाचा कठडा असून यावर तातडीने सुरक्षा जाळे बसवावे, अशी मागणी होत आहे.