Fri, Mar 22, 2019 02:09
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › येळ्ळूर ते खडक गल्ली

येळ्ळूर ते खडक गल्ली

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 22 2017 8:57PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सोमवारी मध्यरात्री खडक गल्ली परिसरात समाजकंटकांनी पोलिसांसमोरच  प्रचंड उत्पात घडविला. पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक ते पोलिस अधिकार्‍यांना जखमी करण्या पर्यंत त्यांची मजल गेली. त्यानंतर कारवाईच्या नावावर दाखविलेला पोलिसांचा दुटप्पीपणा बेळगावकरांना कोड्यात टाकणारा आहे. तीन वर्षांपूर्वी येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य नामफलकप्रकरणी कर्नाटकी पोलिसांनी धुमाकूळ घातला. निष्पापांवर अत्याचार केले. त्यानंतर गांधीनगर, खडक गल्ली येथील दंगलीचा विचार केल्यास बेळगाव पोलिसांची भूमिका संशोधनाचा विषय ठरला आहे. 

दोन वर्षांपूर्वी गांधीनगर परिसरात क्रिकेट खेळातून बाचाबाची झाली होती. या भागातील काही नागरिकांनी तो वाद मिटविण्याचा प्रयत्नही केला होता.  रात्रीच्यावेळी अचानक समाजकंटकांनी हैदोस घातला. समाजकंटकांचा घोळका हातात तलवारी, काठ्या आणि शस्त्रे घेऊन विशिष्ट घरांवर चाल करुन गेला. रस्त्यावरील अनेक वाहने फोडण्यात आली. पोलिसांनी समाजकंटकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजकंटकांनी चक्क पोलिसांवरच हल्ला केला. थांबलेल्या पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिसांच्या वाहनाला आग लावून देण्यात आली. 

धुमाकूळ घालणार्‍या समाजकंटकांची माहिती असतानाही त्यांच्याकडे चौकशी करुन त्यांना अटक करण्याचे धाडस पोलिसांना दाखविता आले नाही. याचप्रमाणे खडक गल्ली परिसरात गेल्या वर्षभरात समाजकंटकांचा हैदोस सुरु आहे. याभागातील समाजकंटक आणि अंमली पदार्थाची विक्री करणार्‍यांची माहिती पोलिसांना आहे. या भागातील अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या यादीवर आहेत. तणावानंतर पोलिसांकडून कारवाईचे नाटक केले जाते. दंगल घडवून समाजकंटक फरार होतात.तणावाच्या वेळी अनावधानाने रस्त्यावर असलेले निष्पाप पोलिसांच्या तावडीत सापडतात. याच प्रकाराची पुनरावृत्ती सोमवारच्या दंगलीनंतर झाली आहे.

येळ्ळूर येथील महाराष्ट्र नामफलक हटविण्यावरुन निर्माण झालेल्या तणावावेळी पोलिसांनी दाखविलेला आतातायीपणा त्यावेळी आगीत तेल ओतण्याचा प्रकार ठरला होता. येळ्ळूरवासियांनी त्यावेळी लोकशाही मार्गाने विरोध दर्शविला होता. मात्र, लोकशाही विसरलेल्या कर्नाटकी पोलिसांनी येळ्ळूरवासियांवर बेछूट हल्ला चढविला. शहरातील दंगलीत समाजकंटकांनी अन्य वाहनांबरोबरच पोलिसांची वाहने फोडली तर येळ्ळूर येथे पोलिसांनीच रस्त्यावरील वाहने फोडण्याचा प्रयत्न केला होता. शहरातील दंगलीत समाजकंटकांनी घरांना आग लावण्याचा प्रकार केला. याउलट येळ्ळूर येथे कारवाईच्या नावावर पोलिसांनी घराघरात घुसून निष्पाप नागरिकांना बेदम मारहाण केली. पोलिसांना घरातील महिला आणि लहान मुलांचाही विसर पडला होता. येळ्ळूर येथील कर्नाटकी पोलिसांच्या निर्दयी कारवाईची मानव अधिकार आयोगानेही दखल घेतली आहे. 
सोमवारी रात्री समाजकंटकांनी पोलिसांनाही सोडले नाही. यावरुन हैदोस माजविणार्‍या समाजकंटकांची मजल कुठपर्यंत पोहोचली होती, याची कल्पना येते. मात्र लोकशाही मार्गाने लढा देणार्‍यांविरोधात असलेल्या हिटलरशाही ‘करनाटकी’ पोलिसांनी बेळगावातील दंगलखोरांसमोर नांगी टाकल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.