होमपेज › Belgaon › सायकल सवारी...बेळगाव ते कन्याकुमारी

सायकल सवारी...बेळगाव ते कन्याकुमारी

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 18 2018 9:07PMबेळगाव : प्रतिनिधी

वाढत्या सुखसोयीमुळे सायकलचा प्रवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परंतु आजही कांही अवलिया सायकलचा वापर जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. यापैकीच एक असणार्‍या प्रा. भरमा कोलेकर यांनी थेट बेळगावहून कन्याकुमारी हे 1500 कि. मी. अंतर सायकलवरून पार केले आहे. यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

बेळगाव येथील जैन महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक असणारे प्रा. कोलेकर हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. कवी, समाजसेवक, शिक्षक, अंनिस कार्यकर्ता या वेगवेगळ्या पातळीवर त्यांचे सातत्याने कार्य सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी त्यांनी कन्याकुमारी गाठली असून मागील दहा दिवसापासून सुरू असणार्‍या टप्प्याचा शेवट केला आहे. रखरखत्या उन्हात तळपत्या किरणाचे चटके सोसत त्यांनी हा प्रवास केला आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.लांब पल्ल्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी केलेले साहस अनेकांच्या डोक्यात अंजन घालणारे ठरले आहे. कन्याकुमारीला प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी बेळगाव ते हलशी हा छोटा प्रवास केला होता. परंतु, त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. सायकल प्रवासाचा प्रचार झाला पाहिजे, ह्या ध्येयाने प्रेरित होवून त्यांनी बेळगाव ते कन्याकुमारी असा दीर्घ पल्ल्याचा टप्पा गाठला आहे.

यासाठी त्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. प्रवासाला संकल्प केल्यानंतर बेळगाव परिसरातील अनेक समाजसेवक, मित्रपरिवाराने साथ दिली. यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. यामुळे  त्यांनी इतक्या मोठ्या प्रवासाला 5 एप्रिल रोजी सुरुवात केली. प्रवासात अनेकांनी त्यांना सहकार्याचा हात पुढे केला. यामुळे कोलेकर यांचा प्रवास सुखकर झाला.

प्रा. कोलेकर हे अतिशय मनस्वी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांचा एक हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित असून मराठी काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक कविसंमेलने त्यांनी काव्यवाचनाने गाजविली आहेत.

एकेकाळी शहरातील रस्ते सायकल स्वारांनी गजबजल्याचे चित्र दिसून येत असे. मात्र काळाच्या ओघात सायकली मागे पडल्या असून इंधनावर चालणारी वाहने वाढली आहेत. यामुळे  सायकली अडगळीत पडल्या असून त्यांना प्रतिष्ठाप्राप्त करून देण्यासाठी सायकल प्रवास केला असल्याची माहिती कोलेकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर याप्रवासात शेतकरी बचाओ, बेटी बचाओ आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर प्रचार केल्याचे सांगितले.