Sun, Feb 24, 2019 00:43होमपेज › Belgaon › स्थायी समिती अध्यक्ष ‘चेंबर’च्या प्रतीक्षेत

स्थायी समिती अध्यक्ष ‘चेंबर’च्या प्रतीक्षेत

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 9:34PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा पंचायत स्थायी समिती अध्यक्षांचा कारभार सध्या चेंबरविना सुरू आहे. स्थायी समिती अध्यक्षासाठी जि. पं. कार्यालयात चेंबर नसल्यामुळे खासगी जागेत कार्यालय थाटून कारभार हाकण्याची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर त्यांना मतदारसंघात प्रवास करण्यासाठी वाहन आणि इंधनसुविधादेखील पुरविण्यात येत नाही.
जि. पं. च्या अखत्यारित अनेक विभाग येतात. त्यामाध्यमातून विकासकामे राबविण्यात येतात. यामध्ये स्थायी समितीची भूमिका महत्त्वाची असते. सर्वसाधारण सभेसाठी विषय निश्‍चित करण्यापूर्वी स्थायी समितीची बैठक होेते. त्याठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण बैठकीसाठी विषय निश्‍चित केले जातात. 

राज्यात सर्वाधिक विस्तार बेळगाव जिल्ह्याचा आहे. यामध्ये 10 तालुक्यांचा समावेश असून 90 सदस्य कार्यरत आहेत . जि. पं. चा मुख्य भार अध्यक्ष-उपाध्यक्षांना असतो. त्याखालोखाल स्थायी समिती अध्यक्षांवर असतो. यामुळे त्यांना आपल्या कामाच्या सोयीसाठी जि. पं. इमारतीत चेंबरची गरज आहे. 

जि. पं. मध्ये सर्वसाधारण स्थायी समिती, नियोजन व लेखा स्थायी समिती, सामाजिक न्यायदान स्थायी समिती, शिक्षण आणि आरोग्य स्थायी समिती, कृषी आणि औद्योगिक स्थायी समिती कार्यरत आहे. प्रत्येक स्थायी समितीत अध्यक्षासह आठ सदस्य कार्यरत असतात. त्यांची दोन महिन्याला एकदा बैठक होते.

सर्वसाधारण स्थायी समितीचे अध्यक्षपद जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे , नियोजन आणि लेखा स्थायी समिती अध्यक्ष जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे , सामाजिक न्यायदान समितीचे अध्यक्ष अकबरअली मरूफ, शिक्षण आणि आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष मोहन मोरे, कृषी आणि औद्योगिक स्थायी समिती अध्यक्ष उमा पाटील 
आहेत.