Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Belgaon › शहरात आता ‘स्मार्ट’ कचराकुंडी

शहरात आता ‘स्मार्ट’ कचराकुंडी

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 05 2018 10:32PMबेळगाव : प्रतिनिधी

पायाने दाबले की झाकण उघडते आणि पाय काढला की झाकण पुन्हा बंद होते, अशाप्रकारची 152 कचराकुंड शहरात बसविण्यात येणार आहेत. 19 लाखांची निविदा असून एका कचरा कुंडाची किंमत 12,500 रुपये आहे. 

शहरात रोज 250 ते 300 टन कचरा जमा होता. शहरातील कचरा तुरमुरी कचरा डेपोत टाकण्यात येतो. स्मार्ट सिटीला चालना देण्यासाठी शहरातील कचराकुंड हटविण्यात आले  आहेत. यामुळे घंटागाडीच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून जमा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. अनेक वॉर्डात घंटागाडी फिरत आहेत. शहरात जागोजागी कचराकुंड नसल्याने शहरवासियांतून रस्त्यावरच कचरा टाकण्यात येत आहे. 

महापालिकेतर्फे स्मार्ट सिटीसाठी शहरात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्मार्ट पाणी देण्याचा उपक्रम नुकताच सुरु करण्यात आला आहे. शहरातील विविध 50 ठिकाणी शुद्ध पाण्याच्या मशीन बसविण्यात येत आहेत. यानंतरही मनपातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

शहरात सध्या असलेले कचराकुंड उघडी आहेत. पावसामुळे पडणार्‍या कचर्‍यात पाणी पडून तो कुजतो आणि सगळीकडे दुर्गंधी पसरते. यासाठी आता बंद झाकणाचे कुंड बसवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शहरात प्रायोगिक पातळीवर भाजी मार्केटमध्ये हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कचराकुंडी बसविण्यात येणार आहेत. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचा संदेश देण्यात येणार आहे. यानंतर पंधरा दिवसात मुख्य ठिकाणी कचराकुंडी बसविण्यात येणार आहेत.

घरोघरी डस्टबिन प्रक्रिया बासनात

दोन वर्षापूर्वी प्रत्येक घरात महापालिकेतर्फे हिरव्या आणि निळ्या रंगाचे दोन डस्टबीन देण्याचे नियोजन होते. मात्र ते झालेच नाही. काही नगरसेवकांनी  स्वखर्चाने आपल्या प्रभागात अशा प्रकारचे डस्टबिन देऊन कचरा जमा करण्याचा प्रयत्न केला. कालांतराने हा उपक्रम बंद पडला. आता आलेल्या घंटागाडीत घरात जमविलेला कचरा ओला व सुका वेगवेगळा न करता तो एकाच पिशवीत बांधून देण्याचा प्रकार नागरिकांनी सुरु ठेवला आहे. यामुळे कचर्‍याचे विघटन होत नाही. 

महापौर, उपमहापौर अनभिज्ञ

शहराची स्मार्ट सिटी अंतर्गत निवड होऊन अडीच वर्षे उलटली. सध्या स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्यात आली आहे. यानुसार शुद्ध पाण्याच्या मशीन, स्मार्ट कचराकुंडी आदी उपक्रम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहेत. यासंदर्भात महापौैर, उपमहापौर यांच्याशी संपर्क साधला. या योजनेबद्दल ते अनभिज्ञ अससल्याचे दिसून आलेे.  याचा अनुभव नागरिकांनाही आला आहे. महापौर, उपमहापौरांनी शहरात राबविण्यात येणार्‍या योजनांबाबत स्मार्ट राहणे आवश्यक आहे.