Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Belgaon › सशस्त्र क्रांतिकारकांना बेळगावात आश्रय

सशस्त्र क्रांतिकारकांना बेळगावात आश्रय

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 10:47PMबेळगाव : प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारची नोंद ब्रिटिशांच्या पार्लमेंटला घ्यावी लागली. त्यांच्या शस्त्रधारी कार्यकर्त्यांना बेळगावकरांनी आसरा दिला होता. या ऐतिहासिक घडामोडीची प्रमुख केंद्र असणारा येथील सराफ वाडा महत्वाचा ठरला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते कॉ. कृष्णा मेणसे यांनी केले. येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे वाङ्मय चर्चा मंडळाच्या सभागृहात क्रांतिवीर नानासिंह पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात कॉ. मेणसे बोलत होते. नाना पाटील यांच्या प्रतिमेला कॉ. मेणसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

कॉ. मेणसे म्हणाले, नाना पाटील यांच्या प्रतिसरकारला बेळगावकरांचीही अप्रत्यक्षपणे मदत झाली आहे. येथील सराफ वाड्यात नाना पाटील यांचे कार्यकर्ते भूमिगत म्हणून होते. यामध्ये जी. डी. लाड, नागनाथअण्णा नायकवाडी, बर्डे मास्तर, नाथाजी लाड यांचा समावेश होता. काही कार्यकर्त्यांनी गोवा येथून आणलेले रिव्हॉल्व्हर लपून ठेवण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी सराफवाड्याचा वापर केला. त्यामुळे इतिहासात सराफवाड्याला खूप मोठे महत्व आहे.

येथील कार्यकर्ते लक्ष्मण आजगावकर, निरंजन मेणसे, सदाशिव कुट्रे यांनी मोठी मदत केली. देेशातील आज राजकर्त्यांनी नाना पाटील यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे.  नाना पाटील सातवी शिकलेले असले तरी त्यांनी आपला ठसा रशियामध्येही उमटविला. इंग्रजांच्या राज्यावर सूर्य मावळत नाही, असे म्हटले जायचे.  मात्र संबंध देशात नाना पाटील यांनी सातार्‍यातील इंग्रजांचे राज्य गायब केले होते. व्यासपीठावर  वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते, उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर, अ‍ॅड. नागेश सातेरी उपस्थित होते.

कॉ. मेणसे यांनी शिकविले हिंदी

1956 साली नाशिक कारागृहात नाना पाटील, कृष्णा मेणसे, भाऊ आजगावकर यांच्या खोल्या लागूनच होत्या. यावेळी कॉ. कृष्णा मेणसे यांनी नानांना हिंदी शिकविले. याचा उल्लेख वारंवार नाना पाटील यांनी आपल्या भाषणात केला आहे. नाना यांना खासदार झाल्यानंतर संसदेमध्ये हिंदीचा वापर चांगल्या पद्धतीने करता आला. ही आठवण कॉ. मेणसे यांनी उपस्थितांना सांगितली.