Sun, Mar 24, 2019 17:00होमपेज › Belgaon › बालविवाहात बेळगाव दुसर्‍या स्थानी

बालविवाहात बेळगाव दुसर्‍या स्थानी

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 08 2018 10:43PMबेळगाव : प्रतिनिधी  

विविध कारणांमुळे बालविवाह प्रकरणे वाढत आहेत. या बाबतीत जिल्ह्याचा क्रमांक दुसरा असून कोप्पळ पहिल्या स्थानी आहे. बालविवाहाच्या दुष्परिमाणांची जागृती आणि मुलींना त्यांच्या पायावर उभे करण्याची गरज यामुळे निर्माण झाली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एन.एफ.एच.एस.) अहवालानुसार राज्यात बालविवाहाचे प्रमाण 21 टक्के आहे.

ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. गरिबी, सामाजिक कारणांमुळे 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच मुलीचे लग्न केले जात आहे. एन.एफ.एच.एच.च्या अहवालानुसार कर्नाटकात 21.4 टक्के बालविवाह होतात. शहरी भागात हे प्रमाण 16.8 आणि ग्रामीण भागात 24.8 टक्के आहे. 2005-06 मध्ये हे प्रमाण 41 टक्के इतके होते. 15 ते 19 वर्षे वय असताना माता किंवा गर्भवती असण्याचे शहरातील प्रमाण 5.3 तर ग्रामीण भागात 9.6 टक्के आहे. एकूण प्रमाण 7.8 टक्के आहे. 2005-06 मध्ये हे प्रमाण 17 टक्के होते.

बेळगावसह विजापूर, बागलकोट, कोप्पळ, दावणगेरे, चामराजनगर येथे मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. यापैकी केवळ काहीच विवाह रोखण्यात महिला आणि बाल विकास अधिकार्‍यांना यश मिळते. पोलिस खात्यासह विविध खात्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. याआधी गरिबी आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बालविवाह केले जात होते. मात्र, आता लैंगिक अत्याचार, प्रेमविवाहाच्या भीतीमुळे 18 वर्षे ओलांडण्याआधीच विवाह केला जात असल्याचे दिसून आले आहे.