Wed, Aug 21, 2019 19:05होमपेज › Belgaon › कैद्यांना नाहीच मिळाले ‘स्वातंत्र्य’

कैद्यांना नाहीच मिळाले ‘स्वातंत्र्य’

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 16 2018 11:39PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील विविध कारागृहांतील कैद्यांच्या सुटकेच्या प्रस्तावावर राज्यपाल वजुभाई वाला यांनी सहमती दर्शविली नसल्याने कैद्यांच्या सुटकेचा  प्रश्‍न लांबणीवर पडला आहे. यामुळे राज्यपालांच्या निर्णयाकडे नजरा लावून बसलेल्या कैद्यांची निराशा झाली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कारागृहांमध्ये विविध प्रकरणांत शिक्षा भोगणार्‍या बेळगाव येथील हिंडलगा कारागृहातील 17 कैद्यांसह राज्यातील 93 कैद्यांच्या सुटकेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. यामुळे वर्तन सुधारलेल्या कैद्यांच्या आशा पल्लवित   झाल्या होत्या. मात्र राज्यपालांकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर कोणताच निर्णय झाला नसल्याने कैद्यांची  सुटका लांबणीवर पडली आहे. 

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वर्तन सुधारलेल्या कैद्यांची सुटका करण्यात येते. त्यानुसार  राज्यातील विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगणार्‍या कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव कारागृहांकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता.  या प्रस्तावावर स्वातंत्र्यदिनापूर्वी राज्य मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आली होती. राज्यातील 93 कैद्यांच्या सुटकेला मान्यता देण्यात आली होती. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी  राज्यपालांकडे पाठविण्यात आला  होता. यामुळे या निर्णयाला महत्व प्राप्त झाले होते.त्यानुसार राज्यपालांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. दि . 15 ऑगस्ट रोजी यावर निर्णय होणार, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र राज्यपालांनी निर्णय दिला नसल्याने कैद्यांची सुटका होऊ शकली नाही.