Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Belgaon › बहुमजली पार्किंग रेंगाळले

बहुमजली पार्किंग रेंगाळले

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:22AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील प्रमुख बाजारपेठेतील वाहन पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी मनपाने खंजर गल्ली व बापट गल्लीत बहुमजली वाहन पार्किंग इमारती बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. यासाठी मनपाने दोन वेळा निविदा मागविल्या. परंतु दोन्ही वेळा त्या नाकारण्यात आल्या. मनपाने दिलेल्या अंदाजित खर्चापेक्षा जास्त रकमेच्या निविदा भरण्यात आल्यामुळे त्या नाकारल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली. यामुळे सध्या तरी बहुमजली पार्किंगचे काम रेंगाळले आहे.

खंजर गल्ली व बापट गल्लीमध्ये मनपाच्या मालकीचीच जागा उपलब्ध असल्याने तेथे बहुमजली पार्किंगसाठी कोणताच अडथळा उद्भवणार नाही, हे स्पष्ट आहे. प्रमुख बाजारपेठेमध्ये एक दिवसाआड एका बाजूला वाहन पार्किंग करण्यात येत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात रहदारीची समस्या भेडसावते. चालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागते. खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, देशपांडे गल्ली आदी भागात वाहन पार्किंगमुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतोे. यावर बहुमजली पार्किंग हाच उपाय आहे.खंजर गल्ली व बापट गल्लीमधील बहुमजली पार्किंग उभारणीसाठी मनपाला 7 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याद्वारे दोन्ही ठिकाणी बहुमजली इमारत उभारण्यात येणार आहे. 

शहराच्या विकासासाठी लवकरच 100 कोटी निधीसंबंधी बैठक बोलाविण्यात येणार आहे. त्यामध्ये उपरोक्‍त दोन्ही ठिकाणी स्थळे उभारण्यासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे तेथील बहुमजली पार्किंगच्या कामाला चालना मिळणार आहे.

शहरातील व्यापारी संकुले व अपार्टमेंटमधील तळमजल्यामध्ये पार्किंगऐवजी बहुतांश ठिकाणी दुकाने व व्यवसाय थाटण्यात आले आहेत.  तेथील व्यापारी व व्यावसायिक वाहने रस्त्यावरच पार्क करतात. परिणामी वाहन पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. बहुमजली इमारतींचे तळमजले कायद्यानुसार पार्किंगसाठीच ठेवलेले असतात. परंतु त्याकडे काही वर्षापासून मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे अपवाद वगळता तळमजले फायद्यासाठी व्यापारी व व्यवसायासाठी वापरले जात आहेत. 

तळमजल्यावर वाहने पार्क केली पाहिजेत. यावर मनपा कठोर कारवाई करील, असे इशारे आजवरच्या मनपा आयुक्‍तांनी दिले. येथून ते बदली होऊन गेले. परंतु तळमजल्यावरील कारवाई आतापर्यंत एकाही आयुक्‍ताला यशस्वी करता आलेली नाही. यापुढे तरी मनपा तळमजल्यावर  दुकाने थाटलेल्यांवर कारवाई करून वाहतुकीला मार्ग सुकर करून देणार का हा प्रश्न आहे. तळमजल्यातील व्यावसायिक आणि दुकानदारांनी अशा कारवाईविरोधात नाराजी व्यक्‍त करून तत्कालीन आमदारांकडे तक्रारी केल्या होत्या.