Sun, Jul 21, 2019 10:21होमपेज › Belgaon › एकी करा, पण शुक्राचार्य ओळखा!

एकी करा, पण शुक्राचार्य ओळखा!

Published On: Feb 12 2018 1:49AM | Last Updated: Feb 11 2018 7:35PMबेळगाव : प्रतिनिधी

एकीची वज्रमूठ आवळण्याचे प्रयत्न कुणामुळे फलद्रुप होत नाहीत, हे लक्षात घेऊन त्यांना जाब विचारण्याचे धाडस झाले तरच सीमालढ्याला आणखी बळ मिळेल. शुक्राचार्य असल्यामुळेच यापूर्वीच्या एकीच्या प्रयत्नाला खीळ बसली. एकी करणार्‍यांनी हे प्रथम ओळखावे. बेकीची पहिली ठिणगी 1982 साली पडली होती, हे लक्षात घेऊन कायमस्वरूपी एकीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे,असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

एकीचे आतापर्यंतचे प्रयत्न अपवाद वगळता फारसे पुढे गेलेले नाहीत, याची कारणे शोधल्यास नेत्यांचा स्वार्थच दिसून येतो. कारण हा मुद्दा दर चार वर्षांनी एकदा निवडणुकीपुरता  ऐरणीवर आणला जातो. विधानसभा निवडणुका पार पडल्या की त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. 

2004 मध्ये नारायण तरळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी तयार करण्यात आली. यात तब्बल 100 जण होते. परंतु ती फार काळ टिकली नाही. 2008 मध्ये पुन्हा नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. 


किरण सायनाक यांना उमेदवारी देण्यात आली. दीपक दळवीही रिंगणात होते. पण त्यांनी समितीच्या विजयासाठी माघार घेतली. तथापि पराभवाची नामुष्की आली. नवीन कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर त्यात एका गटाचाच वरचष्मा राहिला. यामुळे डॉ. एन. डी. पाटील यांनी अर्ज मागवले. त्यावेळी तरळे यांनी डॉ. एन. डीं.वर विश्वास दर्शवला. डिसेंबर 2008 मध्ये डॉ. एन. डी. यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यात दुसर्‍या गटाचे बहुसंख्य लोक होते. तरीही या गटाने याला विरोध केला. यात 40 जण होते. वास्तविक ती सर्वसमावेशक होती. परंतु एका गटाने ती मानली नाही. त्या दिवशी त्या गटाने नवी कार्यकारिणी जाहीर केली. टी. के. पाटील अध्यक्ष झाले. डॉ. एन. डी. पाटील यांच्यावर विश्वास दर्शविणारे तरळे फिरले. हा स्वतंत्र गट जाहीर झाला. या घडामोडीनंंतर डॉ. एन. डी. पाटलांनी कार्यकारिणी जाहीर केली. उद्योजक सुरेशहुंदरे यांच्या पुढाकाराखाली मराठा मंदिरमध्ये व्यापारी, व्यावसायिक आदींची बैठक झाली. 2013 मध्ये शहर समिती जाहीर झाली. यानंतर 22 ऑगस्ट 2013 रोजी त्या गटाने कृती समितीच्या नावाखाली शहर समिती स्थापन केली. 

एकी करू पाहणार्‍यांनी या घडामोडी  आणि डॉ. एन. डी. पाटलांवर अविश्वास व्यक्‍त केलेल्यांबाबतचे राजकारण समजून घेतले पाहिजे. म्हणजे समितीतील शुक्राचार्य कोण हे कळून येईल. अशांचे आणि एकीचे नाटक करणार्‍यांचे काय करायचे, हे आधी ठरवावे लागेल.