Fri, Jul 19, 2019 22:54होमपेज › Belgaon › नेतृत्व येतेय पुढे...

नेतृत्व येतेय पुढे...

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 22 2017 8:50PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गेल्या दीड महिन्यात शहरात तणावाच्या  सहा  घटना घडल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरुन जातीय दंगली घडविल्या जात आहेत. समाजकंटकांना हाताशी धरुन बेळगावकरांना वेठीस धरण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याबद्दल शहरात चिंता व्यक्त होत असतानाच आतापर्यंत मागे राहणारे लोकप्रतिनिधी  दंगलीना आवर, समाजकंटकांचा बीमोड आणी निष्पापांच्या सुटकेसाठी पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. मात्र सकारात्मकतेला प्रामाणिकतेची जोड असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

गेल्या वीस वर्षात बेळगाव शहरात जातीय दंगली झालेल्या पाहायला मिळतात.जातीय दंगलीत पोलिसांच्या कारवाईबरोबरच राजकारणी आणि लोकप्रतिनिधींची भूमिका नेहमीच सर्वसामान्य जनतेला खटकणारी ठरली आहे. खडक गल्ली आणि संवेदनशील परिसरात गेल्या महिनाभरात सहावेळा जातीय दंगलींचा भडका उडाला.दंगलीमुळे संवेदनशील भागातील जनतेला जगणे असह्य झाले आहे. दंगलींचा सर्वाधिक त्रास स्थानिक आणि व्यावसायिकांना बसला आहे.दंगलखोरांच्या कारवाया रोखण्यात पोलिस प्रशासन साफ अपयशी ठरले आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या दंगलीनंतर लोकप्रतिनिधींची भूमिका उदासीन होती. 

महापौर संज्योत बांदेकर, उत्तर मतदारसंघाचे आ. फिरोझ सेठ आणि दक्षिण मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील दंगली घडत असताना काय करत आहेत, अशीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात होती. जनतेच्या भावनांची दखल घेत दै. ‘पुढारी’ने वृत्त  प्रसिद्ध केल्यानंतर सोमवारी झालेल्या दंगलीनंतर काही लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना जाणून बाहेर पडताना दिसत आहेत.

सोमवारी झालेल्या दंगली नंतर आ. फिरोज सेठ यांनी सर्वप्रथम पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप व्यक्त केला. पोलिसांनी अटक केलेल्या निष्पांपाची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी सेठ यांनी प्रभारी पोलिस आयुक्त रामचंद्रराव यांच्याकडे केली.सेठ यांच्या पाठोपाठ आ. संजय पाटील आणी माजी आ. अभय पाटील यांनी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटातील पदाधिकार्‍यांनी रामचंद्रराव  यांची भेट घेऊन निष्पापांच्या सुटकेची आणि समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी चालविलेल्या धरपकड सत्रात निष्पाप गोवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापौर संज्योत बांदेकर यांनी  गुरुवारी खडेबाजार पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस कारवाईचा अधिकार्‍यांना जाब विचारला. समाजकंटकांच्या कारवायांना रोखण्यासाठी आणि पोलिस कारवाईत निष्पापांना गोवण्यात आल्याच्या विरोधात लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी टाकलेली पावले दिलासा देणारी आहेत.  

शहरात वारंवार दंगली घडत असताना दक्षिणचे आ. संभाजी पाटील कोठे आहेत, याचीही जोरदार उलट-सुलट चर्चा सुरु आहे. शहरातील दंगली आणी आमदारांची अलिप्त भूमिका यासंदर्भात आ. संभाजी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. लोकप्रतिनिधींनी संपूर्ण शहराच्या शांततेची जबाबदारी स्वीकारायला हवी. केवळ आपला मतदार संघ आणि ठरावीक जातीधर्माच्या लोकांऐवजी लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून काम केल्यास शहराची शांतता नक्कीच अबाधीत राहील, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.