Sat, Jul 20, 2019 09:14होमपेज › Belgaon › खानापूर रोड उड्डाण पुलाचे काम संथगतीने

खानापूर रोड उड्डाण पुलाचे काम संथगतीने

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 9:40PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

खानापूर रोड रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम खूपच धिम्यागतीने चाललेे आहे. त्यामुळे उड्डाणपूल मुदतीत म्हणजे सहा महिन्याच्या कालावधीत पूर्ण कसा होणार, असा प्रश्‍न बेळगाव शहरवासीयांना पडला आहे. 

जुना रेल्वे ओव्हरब्रिज पाडून तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी नव्या उड्डाण पुलाचे बांधकाम म्हणावे तितके प्रगतीपथावर आलेले दिसून येत नाही. त्यामुळे आता उर्वरित तीन महिन्याच्या कालावधीत तो उड्डाण पूल पूर्ण कसा होणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. शहरामध्ये कपिलेश्‍वर हा एकमेव उड्डाण पूल कार्यरत आहे. त्या पुलावरूनच शहराची वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा फार मोठ्या प्रमाणात ताण पडत असून त्याठिकाणी दररोज सकाळच्या व सायंकाळच्या वेळेला वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्याठिकाणी दररोज नाहक त्रास सहन करावा लागत असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

काही काही वेळा तर अर्ध्या तासापेक्षाही जास्त कालावधीपर्यंत तिष्ठत राहावे लागत आहे. त्यासाठी खानापूर रोड रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम शीघ्रगतीने होण्याची आवश्यकता आहे. हे काम वेळेत पूर्ण करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे खात्याची आहे. रेल्वे खात्याच्या अभियंत्यांनी त्यासाठी दररोज उड्डाण पुलाचे कामकाज कंत्राटदार व त्यांच्या कर्मचार्‍यांकडून करून घेण्यासाठी तत्पर असणे गरजेचे आहे.

प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता त्याठिकाणी मोजकेच कर्मचारी काम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुदतीत रेल्वे उड्डाणपूल तयार होणे महाकठीण असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यासंदर्भात रेल्वे खात्याचे अभियंता रेड्डी यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अभियंता रेड्डी यांनी प्रतिसाद दिला नाही. 

शहरातील वाहतूक कोंंडी कमी करण्यासाठी दिलेल्या मुदतीत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.  रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना रोज नाहक त्रास सहन करावा लागतो. अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहनधारक वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत.  त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पुलाचे काम त्वरित पूर्ण झाल्यास वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून त्यादृष्टीने संबंधितांनी कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.