Wed, May 22, 2019 16:56होमपेज › Belgaon › चाणक्याचे चाणाक्ष ‘बूथ व्यवस्थापन’

चाणक्याचे चाणाक्ष ‘बूथ व्यवस्थापन’

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 17 2018 11:37PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकात भाजपने 40 वरून 104 पर्यंत झेप घेतली. यात राज्यातील पक्षकार्यकर्त्यांचे योगदान असले तरी नेत्यांचा मोठा वाटा आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांची भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण मानली जाते. यातही शहा यांचे योगदान लक्षणीय आणि निर्णायक म्हणता येईल. त्यांच्या कार्यकाळातील हा 15 वा विजय नोंदला गेला आहे.

यामुळे शहा यांचा राजकीय वर्तुळातील दबदबा आणि देशांतर्गत राजकारणातील मुत्सद्देगिरीला तोड नाही. म्हणूनच त्यांना भाजपचे ‘चाणक्य’ संबोधले जाते. कारण त्यांचे कार्य लख्ख आणि बिनतोड असेच आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी त्यांनी राज्याचा दौरा केला, त्यावेळी काँग्रेसला आणि विशेषत: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना धडकी भरली होती. ‘कारण असे किती शहा आले तरी आमचा जनाधार कोणी हलवू शकत नाही’, असे विधान सिध्दरामय्या यांनी केले होते. याचाच अर्थ शहा काही तरी करणार आणि कर्नाटकात जादूची कांडी फिरवणार, असे ध्वनित झाले होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनीही दौरे केले आणि जनतेची नाडी तपासताना कोणत्या मुद‍्यांवर भर आणि जोर द्यायचा हे हेरले होते. तेव्हापासूनच भाजपची मोर्चेबांधणी सुरू होती. याची कल्पना काँग्रेसला उशिरा आली आणि नंतर त्यांचे युवराज मैदानात उतरले. तोवर भाजपने जमीन नांगरून बीजही पेरले होते. 

येडियुराप्पा यांचा शपथविधी गुरुवारी झाला. काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. विजयाचा भगवा फेटा यामुळे शहा यांच्या माथ्यावर शोभायमान झाला आहे. ‘प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या अध्यक्षाकडे आपले मॉडेल म्हणून पाहावे,’ असे गौरवोद‍्गार मोदी यांनी तेव्हाच काढले होते. ते आता खरे ठरत आहेत. शहा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक हा पंधरावा विजय आहे. 

2014 पासून शहा भाजपला धमाकेदार विजय मिळवून देत आले आहेत. पंजाब आणि बिहार वगळता इतर राज्यांत भाजप थेट सत्तेपर्यंत पोहोचला आहे. यामागे शहा यांचे चाणाक्ष ‘बूथ व्यवस्थापन’ आहे. या दोन शब्दांतच विजयाची जादू आहे. याचा अर्थ इतर पक्षांना अजूनही समजलेला नाही. यामुळेच ते पिछाडीवर राहत आले आहेत. यामुळेच शहा यांचे राजकारणाच्या सारीपटावरील ‘दे धक्‍का’ अचंबित करणारा ठरत आला आहे.