Sun, Jul 05, 2020 22:26होमपेज › Belgaon › थकीत ऊस बिले त्वरित द्या : मुख्यमंत्री

थकीत ऊस बिले त्वरित द्या : मुख्यमंत्री

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:16AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

ऊस दिलेल्या शेतकर्‍यांची थकित बिले कारखान्यांनी त्वरित देण्यात यावीत. अशा कारखानदारांची कोणतीच मर्जी न राखता प्रशासनाने कारवाई करून शेतकर्‍यांना सहकार्य करावे, अशी सूचना मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी जिल्हाधिकारी झियाउला एस. यांना केली. 

शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री सिध्दरामय्या व शेतकरी नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून सिध्दरामय्या यांनी जिल्हा प्रशासनाला कडक सूचना केली. 

गेल्या तीन दिवसांपासून शेतकर्‍यांनी कारखान्यांकडे असणार्‍या थकित बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन हाती घेतले होते. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या सौभाग्यलक्ष्मी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनी शेतकर्‍यांची उसाची बिले थकविली आहेत. यासाठी पालकमंत्र्यांचा निषेध करून शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू ठेवले होते. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शासकीय विश्रामगृहात शेतकर्‍यांची बैठक बोलाविली होती. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून आपल्या मंत्रिमंडळातील नेते असू देत अथवा अन्य कोणी,  स्वत: मुख्यमंत्री असले तरी थकित बिल वसूल करून दिले जाईल, असे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले. यावेळी शेतकर्‍यांनी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या सौभाग्यलक्ष्मी कारखान्याकडून उसाची बिले येणे असल्याचे सांगितले. सदर बिल त्वरीत वसूल करून द्यावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना बोलिवण्याची सूचना अधिकार्‍यांना केली. मात्र ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. 

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त करण्यात येते होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांचे कारखान्याकडील थकित बिल वसूल करण्यासाठी तात्काळ पावले उचलली असल्याचे दिसून आले. यामुळेच शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले.