Tue, Mar 19, 2019 03:10होमपेज › Belgaon › बाजारपेठ मोकळी होणार का?

बाजारपेठ मोकळी होणार का?

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 07 2018 10:35PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील नेहमी गजबजलेल्या  गणपत गल्ली परिसराला फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. यामुळे नागरिकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. आगामी काळात येणार्‍या सणापूर्वी अतिक्रमणावर लगाम लावण्याची गरज आहे. या परिसरातील नागरिक आणि व्यापार्‍यांकडून फेरीवाल्यांना शिस्त लावण्याची मागणी होत आहे.

गणतप गल्ली परिसर शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जातो.  बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची दररोज खरेदीसाठी गर्दी होते. मात्र या भागात फेरीवाल्यांची संख्या वाढली असून ते रस्त्यावर ठाण मांडत आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

मागील वर्षी फेरीवाले आणि नागरिकांची बाचाबाची झाली होती. त्यातून हाणामारीची घटना घडली होती. यामुळे पोलिस प्रशासनाने फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सध्या हे प्रयत्न वायफळ ठरले असून फेरीवाल्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची गरज आहे. 

खडेबाजार कार्नर, पांगुळ गल्ली कॉर्नर, भातकांडे गल्ली कॉर्नर, कडोलकर गल्ली कॉर्नर, भाजी मार्केट कॉर्नर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली कॉर्नर याठिकाणी वाहनांची नेहमीच कोंडी होत आहे. फेरीवाले भर रस्त्यात थांबत असल्याने वाहनधारकांना ये-जा करणे अवघड बनत आहे. 

येत्या काळात नागपंचमी, नारळीपौर्णिमा, गणेशोत्सव, श्रावणी सोमवार हे महत्त्वाचे सण येणार आहेत. या काळात बाजार गर्दीचा उच्चांक होतो. नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. ही गर्दी कॅश करण्यासाठी फेरीवाल्याकडून गर्दी होते. याचा फटका या भागातील रहिवाशांनाही बसतो.त्यामुळेच फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

वाहतूक पोलिसांनी काही महिन्यापूर्वी फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. फेरीवाल्यासाठी रस्त्यावर जागा ठरवून दिली होती. मात्र याचा विसर फेरीवाल्यांना पडला आहे. त्यांच्याकडून दुकानासमोर अतिक्रमण करण्यात येत आहे.

नरगुंदकर भावे चौक परिसरातदेखील वाहनांची नेहमीच गर्दी होते. याठिकाणी केळी, फळे विक्रेत्यांची गर्दी झालेली असते. याठिकाणी वाहनांची गर्दी अधिक असते. परंतु, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.