Mon, Jun 24, 2019 17:47होमपेज › Belgaon › जिल्ह्यात भाजप, काँग्रेस तुल्यबळ

जिल्ह्यात भाजप, काँग्रेस तुल्यबळ

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:05AMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीमधील बंडखोरीचा परिपाक म्हणजे यंदा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या जिल्ह्यातील संख्याबळात प्रत्येकी एकने वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण 18 जागांपैकी 10 जागा भाजपने मिळवल्या, तर काँग्रेसने 8 जागा मिळवल्या. 

मंगळवारी जाहीर झालेला निकाल मराठी भाषिकांसाठी निराशाजनक ठरला. बेळगाव दक्षिण आणि खानापूर या दोन मतदारसंघांसह बेळगाव ग्रामीणमध्येही समितीला पराभव स्वीकारावा लागला. बेळगाव दक्षिणची जागा भाजपने, तर बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या जागा काँग्रेसने मिळवल्या. उर्वरित मतदारसंघांत थोड्याफार फरकाने काँग्रेस आणि भाजपने आपल्या जागा राखल्या आहेत. 

समितीनंतर राज्याचे सर्वाधिक लक्ष असलेल्या निपाणी मतदारसंघात भाजपच्या आमदार शशिला जोल्ले यांनी आपला गड राखताना काँग्रेसच्या काकासाहेब पाटलांचा दुसर्‍यांदा पराभव केला. मात्र त्यांचे पती अण्णासाहेब जोल्ले यांना लगतच्या चिकोडी मतदारसंघातून काँग्रेसच्या गणेश हुक्केरींकडून पराभव पत्करावा लागला.

अथणी तालुक्यातील दोन्ही मतदारसंघात परिवर्तन घडले आहे. अथणीतून भाजपचे माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांना काँग्रेसचे महेश कुमठळ्ळी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर काही महिन्यांपूर्वीच निजदमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या श्रीमंत पाटलांनी भाजपच्या राजू कागे यांचा पराभव केला. पराभूत दोन्ही उमेदवारी गेल्या विधानसभेत आमदार होते.

रायबाग आणि कुडची मतदारसंघांमध्ये मात्र भाजपने वर्चस्व राखले. रायबागमधून दुर्योधन ऐहोळे आणि कुडचीतून पी. राजीव यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. जारकीहोळी बंधूंनीही आपापले गड अबाधित राखले. सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डीतून काँग्रेसकडून, रमेश जारकीहोळी यांनी गोकाकमधून काँग्रेसकडूनच तर आरभावी मतदारसंघातून भालचंद्र जारकीहोळी यांनी भाजपकडून विजय मिळवला. उर्वरित कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती-रामदुर्ग, रामदुर्ग या चारही कन्नडबहुल मतदारसंघांपैकी बैलहोंगलमध्ये काँग्रेसचे महांतेश कौजलगी, सौंदत्ती-यल्लाम्मामध्ये भाजपचे आनंद मामणी, कित्तूरमध्ये भाजपचे महांतेश दोड्डगौडर आणि रामदुर्गमध्ये भाजपचेच महादेवप्पा यादवाड विजयी ठरले.


मतदारसंघ    विजयी    पक्ष
 बेळगाव उत्तर    अ‍ॅड. अनिल बेनके    भाजप
 बेळगाव दक्षिण     अभय पाटील    भाजप
 बेळगाव ग्रामीण    लक्ष्मी हेब्बाळकर    काँग्रेस
 खानापूर    डॉ. अंजली निंबाळकर    काँग्रेस
 निपाणी    शशिकला जोल्ले     भाजप
 चिकोडी    गणेश हुक्केरी     काँग्रेस
 अथणी    महेश कुमठळ्ळी     काँग्रेस
 कागवाड    श्रीमंत पाटील     काँग्रेस
 यमकनमर्डी    सतीश जारकिहोळी     काँग्रेस
 हुक्केरी    उमेश कत्ती     भाजप
 गोकाक    रमेश जारकिहोळी     काँग्रेस
 आरभावी    भालचंद्र जारकिहोळी     भाजप
 कुडची    पी. राजीव     भाजप
 रायबाग    दुर्योधन ऐहोळे     भाजप
 कित्तूर    महांतेश दोड्डगौडर     भाजप
 बैलहोंगल    महांतेश कौजलगी     काँग्रेस
 सौंदत्ती-यल्लाम्मा    आनंद मामणी     भाजप
 रामदुर्ग    महादेवप्पा यादवाड     भाजप