Wed, Apr 24, 2019 11:32होमपेज › Belgaon › 600 कोटींच्या घोटाळ्याचे बेळगाव कनेक्शन

600 कोटींच्या घोटाळ्याचे बेळगाव कनेक्शन

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 12:27AMबेळगाव ः प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँकांचा घोटाळा ताजा असतानाच आता आयडीबीआयनेही नियम डावलून तब्बल 600 कोटींचे कर्ज मंजूर केल्याचा घोटाळा उघडकीस आला असून, त्याबद्दल बँकेच्या तत्कालीन 15 अधिकार्‍यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिवाय आयडीबीआयच्या 10 शहरांतील शाखांची झडती घेण्यात आली आहे. त्यामध्ये बेळगाव शहरातील आयडीबीआय शाखेचाही समावेश आहे.

मेल्विन रेगो हा या घोटाळ्याचा सूत्रधार असून तो सध्या सिंडिकेट बँकेचा सीईओ आहे. 2010 ते 2014 या काळात तो आयडीबीआयचा उपव्यवस्थापकीय संचालक असताना हा 600 कोटींचा घोटाळा घडला होता. या प्रकरणी सीबीआय पोलिसांनी  बेळगाव येथील आयडीबीआय बँकच्या अधिकार्‍यांची चौकशी केल्याचे पुढे आले. त्यामुळे बेळगावचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

2010 ते 14 या काळात विदेशी कंपन्यांना नियमांचे उलंघन करून दोन टप्प्यांत 600 कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले होते. त्याविरुद्ध तक्रार नोंद झाल्यानंतर आयडीबीआय बँकेच्या विविध    शाखांमध्ये कार्यरत असललेल्या 15 अधिकार्‍यांसह 38 जणांची चौकशी सीबीआयने हाती घेतली आहे. यात बेळगावच्या शाखेचाही समावेश आहे. 

बेळगावसह बंगळूर, दिल्ली, मुंबई, फरिदाबाद, गांधीनगर, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, आणि पुणे या शहरातील आयडीबीआय शाखांची तपासणी गेले दोन दिवस सुरू आहे.

आयडीबीआयचे तत्कालीन सीइओ व वरिष्ठ  व्यवस्थापक  शिवशंकरन व मेल्विन रेगो यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याचे उलंघन करुन कर्ज वितरण करण्यात  आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. फिनलँड येथील कंपनीला हा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. 

2010ते 14 दरम्यान झालेले कर्ज वितरण बँकेच्या मुंबई येथील कॉर्पोरेट कार्यालयातून झाले आहे. कर्ज मंजूर करताना त्या कार्यालयात नियुक्त असलेल्या असलेल्या अधिकार्‍यांची नंतर बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये बदली करण्यात आली. त्यामधील कांही अधिकारी बेळगाव शाखांमध्ये नियुक्त असल्याने सीबीआयने बेळगाव विभागीतल अधिकार्‍यांची चौकशी केली असू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

मेल्विन रेगो हा सध्या सिंडिकेट  बँकेचा मुख्याधिकारी आहे. रेगोसह इंडियन बँक व्यवस्थापकी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर खरात, तसेच आयडीबीआयचे तत्कालीन चेअरमन एम. एस. राघवन यांचीही नावे संशयितांमध्ये आहेत.

बँक अधिकार्‍यांचे मौन 

600 कोटी रुपये कर्ज वितरणप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी केली असल्याची अधिकृत माहिती आपल्याला नसल्याचे तसेच याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलू शकत नसल्याचे विभागीय शाखेच्या अधिकार्‍यांनी दै. पुढारीला सांगितले.

स्थानिक अधिकारी अनभिज्ञ

सीबीआय अधिकार्‍यांकडून शहरातील आयडीबीआय बँक अधिकार्‍यांची 600 कोटी कर्ज वितरणप्रकरणी चौकशी झाली. मात्र, या चौकशीबाबत स्थानिक पोलिस यंत्रणेला कोणतीच कल्पना नव्हती. ‘पुढारी’ने वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला या चौकशीबाबत स्थानिक पोलिसांना कल्पना देण्यात आली नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली.