Sat, Jul 20, 2019 02:12होमपेज › Belgaon › ‘बस डे’ला बंदचा फटका 

‘बस डे’ला बंदचा फटका 

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 9:37PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

परिहवन महामंडळातर्फे प्रत्येक महिन्याच्या 20  तारखेला ‘बस डे’ चे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त बुधवारी (दि.20) शहरात आयोजित बस डे ला शहरवासीयांचा अल्प प्रतिसाद मिळाला. बुधवारी चिकोडी, बैलहोंगल बंद होते. तसेच बेळगावातील जातीय दंगलीमुळे मागील महिन्याच्या तुलनेत महसुलात घट झाली. 

शहराला नेहमीच वाढत्या रहदारीच्या समस्या भेडसाव आहे. वाढती वाहनसंख्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यासाठी 20 नोव्हेंबरपासून शहरात ‘बस डे’ चे आयोजन करण्यात येत आहे. वाहनधारकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर टाळून जास्तीत जास्त बसने प्रवास करावा हाच यामागील उद्देश आहे. मात्र, परिवहन मंडळाकडून अजूनही म्हणावी तशी जागृती होताना दिसत नाही. यामुळे ‘बस डे’ ला अल्प प्रतिसाद मिळत आहे. 


जिल्हा मागणीसाठी बुधवारी चिकोडी व बैलहोंगल बंद होता. तसेच खडक गल्लीतील दंगलीमुळे ‘बस डे’ ला प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. 20 नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री रेवण्णा यांच्याहस्ते उद्घाटन करून ‘बस डे’ चा शुभारंभ करण्यात आला होता.  बेळगावात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीदेखील एक दिवस बसने प्रवास केला होता. 

परिवहन मंडळाकडून महिन्यातून एक दिवस बस डे राबविला जातो. शिल्लक दिवसात प्रवाशांना त्याचा विसर पडलेला दिसून येतो. यासाठी दररोज ‘बस डे’ ही संकल्पना राबवली पाहिजे. जेणेकरून प्रत्येकाला विसर पडणार नाही व जास्तीत जास्त बसचा वापर केला जाईल. तसेच परिवहनच्या महसूलात देखील वाढ होण्यास मदत होईल. ही संकल्पना राबविताना जागृती करणे गरजेचे आहे.