बेळगावः प्रतिनिधी
संभाजी भिडे यांची सभा आज (बुधवार) चिकोडी येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव जिल्ह्याधिकारी झियाउल्ला यांनी सभेला परवानगी नाकारली आहे. भिडे यांच्यावर बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. ७ मार्चपर्यंत त्यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी आहे.
यापूर्वीही भिमा कोरेगाव दंगल प्रकरणानंतर भिडे यांच्या बेळगावातील सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावेळी सुद्घा त्यांना जिल्हा प्रवेश बंदी घातली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात श्रीमंत कोकाटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला होता. या गोंधळामुळे कोकाटे यांचे व्याख्यान ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने भिडे यांना जिल्हा प्रवेश नाकारला असून त्यांच्या सभेलाही परवानगी देण्यात आलेली नाही.