Wed, Apr 24, 2019 19:36होमपेज › Belgaon › बेळगावातील कुणाला मिळणार मंत्रीपद?

बेळगावातील कुणाला मिळणार मंत्रीपद?

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 17 2018 11:33PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस, निजद आणि भाजप या तिन्ही पक्षांनी सरकार स्थापनेसाठी कसरती केल्या. गेल्या दोन दिवसांत अनेक घडामोडींनंतर राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानुसार येडियुराप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बहुमत सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्यातील सातपैकी तिघांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अठरा मतदारसंघांमध्ये भाजपने दहा तर काँग्रेसने आठ जागा जिंकल्या आहेत. भाजप उमेदवार उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी माजी मंत्री आहेत. अभय पाटील (जैन कोटा अंतर्गत), आनंद मामनी, दुर्योधन ऐहोळे तिसर्‍यांदा निवडून आले आहेत. शशिकला जोल्‍ले दुसर्‍यांदा निवडून आल्या आहेत. पी. राजीव अनुसूचित जातीतील आहेत. त्यामुळे यांच्यात मंत्रीपदासाठी रस्सीखेच होणार हे निश्‍चित आहे.

दरम्यान, भाजपला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यास युती सरकार सत्तेवर येईल. बेळगाव जिल्हा मोठा असून एकूण अठरा मतदारसंघ आहेत. त्यामुळे जिल्ह्याला दोन ते तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस सरकार अस्तित्वात असताना सतीश जारकीहोळी आणि रमेश जारकीहोळी मंत्रिमंडळात होते. गत कार्यकाळात संसदीय सचिव असणारे गणेश हुक्केरी, कर्नाटक महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, विधान परिषद सदस्य महांतेश कौजलगी यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच होईल.

राज्यात कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी त्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील किमान तिघांचा तरी समावेश असावा. विकासकामे गतीने व्हावीत, शांतता नांदावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांची आहेत.