Fri, Jul 19, 2019 20:26होमपेज › Belgaon › राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी रस्ते दुरुस्ती, रंगकाम हाती

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी रस्ते दुरुस्ती, रंगकाम हाती

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 11 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी 

 राष्ट्रपती कोविंद दि. 15 रोजी बेळगाव दौर्‍यावर येणार असल्याने प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. रस्ते दुरुस्ती, रंगकाम, पथदीप दुरुस्तीसारखी कामे हाती घेण्यात आली असून नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री कुमारस्वामींसह अन्य बडे नेते उपस्थित राहणार आहेत. याची धास्ती प्रशासनाने घेतली असून विकासकामांचा धडाका लावला आहे.

अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची दैना उडाली होती. यामुळे नागरिकाकडून वारंवार दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. परंतु, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविले होते. मात्र राष्ट्रपती बेळगावात येत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राष्ट्रपतींच्या आगमनाला अवघे चार दिवसाचा कालावधी बाकी असताना दुरुस्ती कामे जोमाने सुरू आहेत. खड्ड्यांमुळे हवालदिल बनलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रपतींना शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था दिसू नये यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. त्यांना खराब रस्त्याचा फटका बसू नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत असतात, रस्त्याची पूर्ण दुरुस्ती करण्यात येत आहे. यामुळे मान्यवरांची वाहने सुसाट धावणार आहेत.

सांबरा विमानतळ ते टिळकवाडी या मार्गावरील रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला होता. यामुळे याठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. दिवसा रस्ता दुरुस्तीची कामे होत नसल्याने रात्रीच्यावेळीदेखील कामे हाती घेतली आहेत. रस्ता दुभाजकांना रंगकाम करण्यात येत आहे. 

दर्जाबाबत साशंकता?

अत्यल्प कालावधीत कामे करण्याचे नियोजन अधिकार्‍यांनी केले आहे. त्यानुसार ठेकेदारांना आदेश देण्यात आले आहेत. यामुळे घाईगडबडीत कामे उरकण्याचा प्रयत्न सुरू आहे. निर्धारित वेळेत कामे संपवण्याचा प्रयत्न ठेकेदारांकडून सुरू आहे. यामुळे दर्जाकडे डोळेझाक करण्यात येत आहे. सरकारचा निधी वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.