Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Belgaon › चिखलेजवळ शेतात एसआयटीचा तपास

चिखलेजवळ शेतात एसआयटीचा तपास

Published On: Aug 20 2018 1:36AM | Last Updated: Aug 20 2018 12:38AMबेळगाव, जांबोटी : वार्ताहर

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) रविवारी भरत कुरणेच्या जांबोटीजवळच्या चिखले गावातील शेताची पाहणी केली. तसेच आणखी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

महाद्वार रोड परिसरात राहणार्‍या भरत कुरणेला बंगळूर एसआयटीने दोन आठवड्यांपूर्वी अटक केली. त्याच्या चिखलेजवळच्या शेतात गौरी लंकेशवर गोळ्या झाडणार्‍या शूटरना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. एकूण 12 जणांना या शेतात प्रशिक्षण दिले गेल्याचे मानले जाते. 

रविवारी भरत कुरणेला सोबत घेऊन सआयटीने या शेताची पाहणी केली.  या शेतात एका निवृत्त जवानाने युवकांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान गोळ्या चालवण्याचा आवाज ऐकू जाऊ नये, यासाठी प्रशिक्षण देताना मोठ्या आवाजात संगीत लावले जात होते, असेही एसआयटीचे म्हणणे आहे. 

रविवारी भेट दिलेल्या पथकात 20 हून अधिक अधिकार्‍यांचा समावेश होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. एसआयटीने परिसराची माहिती घेण्यासाठी चिखले गावातीलही एका युवकाला सोबत घेतले होते. स्थानिक लोक चौकशी आणि पिस्तूल प्रशिक्षणाबाबत अनभिज्ञ आहेत.

दुपारी तीनच्या सुमारास एसआयटी अधिकारी चिखले येथे दाखल झाले. कुरणेचे शेत गाठून सायंकाळी 6 पर्यंत तपास करण्यात आला. हा तपास गुप्तरीत्या सुरू आहे. शस्त्रप्रशिक्षण दिलेल्या ठिकाणाचे फोेटो घेण्यात आले.  कुरणेच्या शेताता फायरिंग रेंजसारखा वापर झाल्याचेही एसआयटीचे म्हणणे आहे.

एसआयटी चौथ्यांदा बेळगावात दाखल झाली असून, यापूर्वीच्या तीन भेटींमध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. विजापूर जिल्ह्यातील सिंदगीतून परशुराम वाघमारेला पहिल्यांदा अटक करण्यात आली. त्याला बेळगावला आणून त्याने दिलेल्या माहितीवरून जांबोटी, लोंढा जंगलात तपास करण्यात आला. तर, तिसर्‍या दौर्‍यात भरत कुरणेला ताब्यात घेण्यात आले. आज रविवारीही आणखी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.