Fri, May 24, 2019 06:23होमपेज › Belgaon › हेब्बाळकर, जारकिहोळी वाद बंगळुरात

हेब्बाळकर, जारकिहोळी वाद बंगळुरात

Published On: Sep 02 2018 1:10AM | Last Updated: Sep 01 2018 10:58PMबेळगाव : प्रतिनिधी

आ. लक्ष्मी हेब्बाळकर आणि जारकिहोळी बंधूंमध्ये  निर्माण झालेला वाद बंगळुरात पोहोचला आहे. आ. हेब्बाळकर यांनीच प्रदेश काँग्रेसकडे तक्रार केली असून, तूर्त  हेब्बाळकर यांना संयम राखण्याची सूचना वरिष्ठांनी दिली असल्याची माहिती समजते. 

आ. लक्ष्मी हेब्बाळकर व सतीश जारकिहोळी यांच्यामध्ये पीएलडी निवडणुकीवरून तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही आमदारांनी आपल्या समर्थकाची अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी कंबर कसली असून यातून संचालकांची पळवापळवी करण्यात आल्याचा आरोप-प्रत्यारोप  करण्यात आले.  यामध्ये पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांनी हेब्बाळकर यांच्यावर टीका केली. यामुळे काँग्रेसअंतर्गत राजकारण पेटले आहे.

उपरोक्‍त राजकारण पक्षासाठी धोकादायक असल्याचे मत कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाले आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांमध्ये वरिष्ठांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. हेब्बाळकर यांनी जारकिहोळी बंधूंच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न शनिवारी केला. त्यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी हेब्बाळकर यांना संयम पाळण्याची सूचना केल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यामध्ये निर्माण झालेला बेबनाव योग्य नसून मतभेद मिटविण्याची सूचना केल्याचे सांगण्यात येते.