Fri, Jul 19, 2019 07:23होमपेज › Belgaon › निवडणूक संपली, पण सीमाप्रश्न अजून जिवंतच!

निवडणूक संपली, पण सीमाप्रश्न अजून जिवंतच!

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 18 2018 1:15AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीमध्ये म. ए. समितीच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. निपाणी, कारवार पाठोपाठ बेळगाव व खानापूरात समिती संपली अशी चर्चा राष्ट्रीय पक्षातील कार्यकेर्ते करीत आहेत. सोशल मिडीयावरही या संदर्भात एकमेकावर चिखलफेक होत आहे. पण मूळ समिती कार्यकर्त्यांच्या मनात सीमाप्रश्न कायम आहे. निवडणूक संपली सीमाप्रश्‍न नाही, अशा प्रतिक्रिया त्यामुळेच व्यक्त होत आहेत.

 बेळगावसह ग्रामीण व खानापूर तालुक्यात म. ए. समितीचा एकच उमेदवार रिंगणात राहावा अशी मराठी भाषीकांची मागणी होती. त्यासाठी एकाच छताखाली या,  एकच उमेदवार द्या यासाठी कांहीजणांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र यश आले नाही. शहरातील वडगाव, शहापूर भागात गल्लोगल्लीच्या फलकावर म. ए.  समितीबध्दल मजकूर लिहून मराठी भाषिक आपली भूमिका स्पष्ट करीत होते. त्याचे फोटो सोशल मिडीयावर वेगाने फिरत होते. तरीदेखील रिंगणात उभे राहीलेल्या उमेदवारांना एकी करावीशी वाटली नाही. बंडखोर उमेदवारांना  मराठी रोषाला सामोर जावे लागले. शहापूर, वडगाव, शिवाजीनगर, चव्हाटगल्ली, बहाद्दरवाडी येथून त्यांना माघारी पाठवण्यात आले.

उमेदवार निवडीवरुन म.ए. समितीमध्ये पूर्वीप्रमाणेच दोन गट तयार झाले.  निवडणूकीवर बहिष्कार, एकी झाली नाही तर गल्लीत प्रवेश नाही, एकी करत नसाल तर आमच्या वार्डात प्रचाराला फिरकू नका, अशा प्रकारचे  फलक गल्लोगल्ली लागले.

31 मार्च रोजी माजी कृषी मंत्री शरद पवार, प्रा. एन. डी. पाटील यांच्या सभेला बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण मतदार संघातील दिग्गज नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण त्याचाही परिणाम बेकी करणार्‍यांवर झाला नाही.

प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची निवड व्हावी, असा संदेश माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला होता. तरीही समितीच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना दोन्ही गटातील समितीच्या नेत्यांनी आपापले स्वतंत्र अर्ज दाखल केले. 

माघारीसाठी व एका मतदार संघात एकच समितीचा उमेदवार राहावा यासाठी कै. सुरेश हुंदरे मंच व पाईक, वार्डातील ज्येष्ठ पंचमंडळीनी प्रयत्न केले. मात्र त्यालादेखील यश आले नाही. प्रत्येकजण आपल्याच मतावर ठाम असल्याने पुन्हा येरे माझ्या मागल्या असाच सूर कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांनी लावला. 

समितीच्या पराभवानंतर राष्ट्रीय पक्षातील नेते व कार्यकर्त्यानी समिती संपली, असा निष्कर्ष काढायला सुरुवात केली. त्याचे पडसाद सोशल मिडीयावर देखील उमटू लागले. सीमाभागातील मराठी भाषिकांना हे रुचले नाही. त्यानी गल्लीच्या कोपर्‍यावर असलेल्या मंडळाच्या फलकावर निवडणूक संपली खरं सीमाप्रश्‍न नाही. स्वाभीमान हरला आणि पैसा जिंकला पण लक्षात ठेवा अजून आमचा सीमाप्रश्‍न जिवंत आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

बंडखोराचे झाले हसे...

बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक राज्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागातील 4 मतदारसंघांचा निकाल भाजप आणि काँग्रेसच्या बाजूने लागला. मागील विधानसभेत सीमाभागात 2 आमदार समितीचे झाले होते. यावेळी मात्र सपशेल निराशा झाली. बंडखोरांमुळे सीमाभागात समितीला धक्का बसला. याच बंडखोरांनी 4 विधानसभा मतदारसंघांत 28 हजार 709  मते घेतली आहे. त्यामुळे बंडखोरांचे हसे झाले आहे.

मागील निवडणुकीत समितीने बेळगाव दक्षिण आणि खानापूर या ठिकाणी दोन आमदार निवडूण आणले होते. तसेच ग्रामीणच्या जागेवर 1 हजार तीनशे मतांनी पाणी सोडावे लागले होते. त्यावेळीही बंडखोरांनीच समितीच्या विजयात खोडा घातला होता.

 दोन आमदार असल्यामुळे यंदा समिती कार्यकर्त्यांची आशा कायम होती. सीमाभागात समितीच्या चारही जागा निवडून आणण्याची जिद्द कार्यकर्त्यांनी बाळगली होती. मात्र, बंडखोरांच्या हेकेकोर वृतीमुळे समितीची एकही जागा निवडून आली नाही. बेळगाव ग्रामीणमधून समितीचे मनोहर किणेकर यांच्या विरोधात बंडखोर गटातून मोहन बेळगुंदकर उभारले होते. पण बेळगुंदकर सातव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांनी फक्त 694 मते घेतली. 

बेळगाव उत्तरमधून बाळासाहेब काकतकर उभारले होते. ते तिसर्‍या क्रमांकावर होते. त्यांना 1869 मतांवर समाधान मानावे लागले.  बेळगाव दक्षिणमधून समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे यांच्या विरोधात बंडखोर गटातून किरण सायनाक यांनी निवडणूक लढविली. ते चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना 8295 मते पडली. 

खानापूरमधून आ. अरविंद पाटील यांच्याविरोधात बंडखोर समितीतून विलास बेळगावकर होते. ते पाचव्या क्रमांकावर होते. त्यांना 17,851 मते पडली. बंडखोरांना चार ठिकाणी फक्त 28  हजार 709 मते घेऊन समाधान मानावे लागले. 

अधिकृत म. ए. समितीने तीन ठिकाणी उमेदवार दिले होते. त्या उमेदवारांना  71926  इतकी मते पडली.  मनोहर किणेकर यांना 23776, प्रकाश मरगाळे यांना 21537, अरविंद पाटील यांना 26613 इतकी मते पडली. बंडखोरांच्या वृत्तीमुळे सीमाभागातील लोकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.