Mon, May 20, 2019 18:42होमपेज › Belgaon › ‘महाराष्ट्रात जाण्यासाठी इंच इंच लढू’

‘महाराष्ट्रात जाण्यासाठी इंच इंच लढू’

Published On: Jan 18 2018 12:10PM | Last Updated: Jan 18 2018 12:01PM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍नाच्या अंतिम टप्यात लढ्याची ताकद वाढविण्यासाठी मराठी भाषिकांनी एकसंघ राहणे आवश्यक आहे. आमची मराठी अस्मितेशी नाळ जोडली गेली असल्याने समिती हीच आपली जननी आहे. भगव्या झेंड्याशी इमान राखून शेवटच्या श्‍वासापर्यंत आम्ही सीमालढ्याची इंच इंच खिंड लढवू, असा दुर्दम्य विश्‍वास घोटगाळी भागातील जनतेने व्यक्त केला.

तालुका म. ए. समितीच्यावतीने सोमवारी भांबार्डा, मडवाळ, रंजनकोडी, घोटगाळी, देवराई, सुलेगाळी, देवराई, बस्तवाड, रेडेकुंडी  या भागात सीमाप्रश्‍न जागर अभियान काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी सर्वच गावातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने समिती कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला.

मडवाळ येथील लक्ष्मी मंदिरासमोर झालेल्या बैठकीत बोलताना आबासाहेब दळवी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी सीमाभागातील जनता अद्यापही पारतंत्र्यातच आहे. मातृभाषेतून बोलण्यावर बंदी घातली जाते. मराठीतून व्यवहार करण्यावर निर्बंध लादले जातात. अशा कर्नाटकी अत्याचारात गुलामगिरीचेच जगणे मराठीजणांच्या वाट्याला आले आहे. त्याचा जिद्दीने मुकाबला करण्यासाठी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढ्याचे बळ वाढविण्यावर भर द्यावा. 

माजी ता. पं सदस्य विठ्ठल गुरव म्हणाले, सीमाभागात सर्व मानवी नितीमूल्ये पायदळी तुडवून रोजच लोकशाहीचा गळा घोटण्याचे महापातक कानडी सरकार करत आहे. चळवळीची ताकद वाढविण्यासाठी मराठी भाषिकांचे संघटन ही काळाची गरज आहे. 

रुक्माण्णा झुंजवाडकर म्हणाले, हुतात्म्यांचे आशिर्वाद आणि सीमावासियांच्या सदिच्छा यांच्या जोरावर न्यायदेवता आमच्याच बाजुनेच निकाल देईल. तोपर्यंत प्रामाणिकपणे संघर्ष करत राहणे आपले कर्तव्य आहे.

मडवाळ, घोटगाळी, देवराई येथील पदफेरीमध्ये युवावर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेऊन घरोघरी पत्रकांचे वाटप केले. यावेळी बी. बी. पाटील, मुरलीधर पाटील, के. पी. पाटील, कृष्णा मन्नोळकर, दीपक देसाई, महादेव घाडी, विवेक गिरी, शिवाजी पाटील, प्रकाश चव्हाण, अमृत पाटील, ब्रम्हानंद पाटील आदी उपस्थित होते.