Sat, Jul 20, 2019 11:03होमपेज › Belgaon › बाप्पा आज येणार

बाप्पा आज येणार

Published On: Sep 13 2018 1:42AM | Last Updated: Sep 13 2018 12:08AMबेळगाव : प्रतिनिधी

वैभवशाली परंपरा लाभलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाची सुरुवात गुरुवारी होणार आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक आतूर झाले असून, घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन होणार आहे. यानंतरचे अकरा दिवस भक्तिमय वातावरण राहणार आहे. उत्सवानिमित्त शहर परिसरात उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सव भाविकांना नेहमीच भूरळ घालतो. गणेशचतुर्थीचे औचित्य साधून घरोघरी येणार्‍या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवापूर्वीच मूर्ती मंडपात आणून ठेवल्या  आहेत. गुरुवारी घरोघरी पूजेची लगबग राहणार आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप, देखावे, सजावट आणि विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. आगामी अकरा दिवस स्मार्ट सिटी मंगलमय वातावरणासह बाप्पाच्या गजराने दणाणून जाणार आहे.

114 वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या बेळगाव पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 950 तर  शहरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत. कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव तयारीत कोणत्याही प्रकारची कसर राहू नये, याकडे लक्ष दिले आहे. शहर आणि उपनगरातील काही महत्वाच्या मंडळांनी लाबादाप्रमाणे या वर्षीही भव्य देखावे आणि आकर्षक विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. 

काही मंडळांनी विधायक उपक्रमाबरोबर प्रबोधनात्मक कार्यक्रमांवरही भर दिला आहे.  खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सणाला विधायक वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बेळगाव शहराबरोबर शहापूर, वडगाव, खासबाग, शास्त्रीनगर,  जुने बेळगाव, शिवाजीनगर, गांधीनगर, सदाशिवनगर,  होसूर आदी भागातील मंडळांनी आपल्या देखावे आणि विद्युत रोषणाईचे काम पूर्ण केले आहे. गल्लोगल्ली विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी अकरा दिवस संपूर्ण शहर उजळून निघणार आहे.
 श्रीमूर्ती आणण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयारी चालविली आहे. श्रीमूर्ती आणण्यासाठी ट्रॉली बनविली आहे. घरगुती श्रीमूर्तींची पूजा झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते सार्वजनिक श्रीमूर्ती आणण्यासाठी बाहेर पडणार आहेत. 

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी घराघरातून जोरदार तयारी झाली आहे. गणेशभक्तांनी बाप्पाच्या स्वागतासाठी घरांची रंगरंगोटी केली आहे. सजावट आणि विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. तसेच देखाव्यावरही भर देण्यात आला आहे.

बुधवारीच मूर्ती मंडपात

ऐन गणेशोत्सवादिवशी कार्यकर्त्यांची धावपळ होते. घरगुती गणपतीच्या पूजेबरोबरच मंडळाच्या गणेश मूर्ती आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कसरत करावी लागते. हे टाळण्यासाठी अनेक मंडळांनी बुधवारी मूर्ती मंडपात आणणे पसंत केले. यापूर्वीदेखील मंडळांनी मूर्ती आणल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील भाविकांनी बुधवारी सायंकाळी गणेशमूर्ती घरी नेणे पसंत केले. यामुळे बुधवारी गणेशमूर्ती नेताना भाविक दिसत होते.