होमपेज › Belgaon › ‘अनिलभाग्य’ला होणार पुन्हा विलंब

‘अनिलभाग्य’ला होणार पुन्हा विलंब

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 16 2018 10:26PMबेळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री अनिलभाग्य योजना स्वातंत्र्यदिनापासून सुरू करण्यात येणार होती. मात्र, पुन्हा एकदा योजनेला विलंब होण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांकडे याविषयी चौकशी केल्यानंतर तेल कंपन्यांकडून 15 ऑगस्टपासून लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. तेल कंपन्यांकडून अजूनही मंजुरी मिळाली नसल्याने योजनेला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
गत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी योजना जारी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर ही योजना आखण्यात आली होती. याबाबत 24 जुलैला अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री जमीर अहमद खान यांनी बैठक घेऊन एक लाख लाभार्थींना गॅस वितरणासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे सांगितले होते. 15 ऑगस्टपासून योजना लागू होत असून दोन महिन्यांत गॅस कीट वितरित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

फेब्रुवारीतच योजना जारी करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता. त्याची तयारीही सुरू केली होती. मात्र, विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने योजना बारगळली. निवडणुकीनंतर काँग्रेस-निजद युती सरकार अस्तित्वात आले. या सरकारने ही योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

योजना जारी करण्यासाठी सरकारने आवश्यक तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात 10 लाख कुटुंबांना आणि एकूण 30 लाख कुटुंबांना मोफत गॅस वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या एक लाख गॅस कीटचा साठा उपलब्ध आहे. 30 हजार लाभार्थींची यादी तयार आहे. उर्वरित लाभार्थींची यादी तयार करण्याचे आदेश ग्राम पंचायतींना देण्यात आले आहेत. सरकारी खात्यांनी तयारी केली तरी तेल कंपन्यांनी अजूनही गॅस कनेक्शनसाठी मंजुरी न दिल्याने समस्या निर्माण झाली आहे. सद्य परिस्थितीचा विचार केल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात योजना जारी होण्याची शक्यता असल्याचे 
अधिकारी सांगतात.