Tue, Nov 20, 2018 17:06होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील 750 शाळा खोल्या पाडा

जिल्ह्यातील 750 शाळा खोल्या पाडा

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 05 2018 11:17PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील हजारो सरकारी शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. सुमारे 5163 शाळांमधील 9,608 खोल्या जमीनदोस्त करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील 539 शाळांतील 1031 धोकादायक खोल्या असून त्यापैकी 750 खोल्या पाडून नव्याने बांधकाम करावे लागणार आहे.

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील यमकनमर्डी येथील सरकारी शाळेची इमारत कोसळून दोन विद्यार्थी ठार झाले होते. त्यानंतर शिक्षण खात्याने सरकारी शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून 3,083 धोकादायक खोल्या पाडण्याचे ठरविले. या खोल्या पाडण्याआधीच धोकादायक खोल्यांची संख्या आता 10 हजारपर्यंत पोचली आहे.

2016-17 मध्ये एकूण 48 हजार सरकारी शाळांमधील 8,957 प्राथमिक शाळा इमारतींची दुरूस्ती आवश्यक असल्याचा अहवाल विशेष अध्ययन समितीने  दिला होता. त्यापैकी बहुतेक खोल्यांचे छत, छप्पर कोसळण्याच्या मार्गावर किंवा गळती लागल्याचे दिसून आले. गतवर्षी शिक्षण खात्याने 3,083 खोल्या पाडण्याची मंजुरी दिली आहे. यंदा 6,525 खोल्या जमीनदोस्त करण्याबाबत शिक्षण खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे मत विचारले आहे. यामुळे बांधकाम अधिकारी धोकादायक शाळा इमारतींची पाहणी करत आहेत. जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडून धोकादायक ठरविण्यात आलेल्या बहुतेक इमारती पाडण्याची शिफारस बांधकाम खात्याकडून केली जात आहे.

धोकादायक इमारतींची पाहणी करून 15 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आली होती. मात्र, ही पाहणी टप्प्याटप्प्याने केली जात असून अहवालाला काही काळ विलंब होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील 10 खोल्यांची पाहणी करून अहवाल दिला जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील 539 शाळांमधील 1,031 धोकादायक खोल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 750 खोल्या पाडण्याची शिफारस शिक्षण खात्याकडे करण्यात आली आहे.