Tue, Mar 26, 2019 19:58होमपेज › Belgaon › अधिवेशनाच्या मांडवात प्रचाराची तुतारी

अधिवेशनाच्या मांडवात प्रचाराची तुतारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : शिवाजी शिंदे

हिवाळी अधिवेशनाचे  सूप शुक्रवारी वाजले. अधिवेशनाच्या नावावर राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तुतारी फुंकली. अधिवेशनाच्या मांडवात निवडणूक प्रचाराची वरात काढली. परिणामी मंत्री, आमदार हे अधिवेशनात कमी आणि पक्षाच्या कार्यक्रमात  अधिक दिसून आले.

सीमाभागातील मराठी बांधवांना खिजवण्यासाठी कर्नाटक सरकारकडून बेळगावात अधिवेशन घेण्याचा सोपस्कार केला जातो. अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा करण्याची अपेक्षा करण्यात येते. परंतु, अधिवेशनाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. अनेकवेळा सभागृहात कोरम भरला नसल्याने सभागृह तहकूब करावे लागले.

अधिवेशनात कोणताच ठोस निर्णय झाला नाही. केवळ वैद्यकीय विधेयकाला मंजुरी देण्यात आली. उर्वरित काळात सर्वच पक्षांनी आगामी  निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. यामुळे मंत्री, आमदार सभागृहात कमी आणि प्रचारात अधिक असे चित्र दिसले.

अधिवेशनाचे औचित्य साधून काँग्रेस, भाजप, निजद यांनी निवडणुकीची तुतारी फुंकली. भाजपची परिवर्तन यात्रा, काँग्रेसचे मेळावे, निजदची घरोघरी कुमारस्वामी कार्यक्रम राबविण्यात आले. यासाठी मंत्री, आमदारांचा आणि पक्षाच्या नेत्यांचा खुबीने वापर केला गेला.

यामध्ये सर्वाधिक आघाडी घेतली ती भाजपने. बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत परिवर्तन यात्रा काढण्यात आली. याला राज्यभरातील नेत्यांनी हजेरी लावली. जंगी शक्तिप्रदर्शन केले. 

काँग्रेसनेही याचा खुबीने फायदा करून घेतला. अनेक योजनांचा नारळ फोडला. चिकोडी येथे हुक्केरी पितापुत्रांनी जंगी मेळावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी उपस्थिती दाखविली. यातून प्रचाराचा धुरळा उडवून देण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यात निजदचे अस्तित्व नगण्य आहे. परंतु, त्यांनीही अधिवेशन काळाचा फायदा उचलला. माजी पंतप्रधान देवेगौडा  यांच्या उपस्थितीत सीपीएड मैदानावर मेळावा घेतला. यातून ‘घरोघरी कुमारस्वामी’चा नारा दिला.

अन्य छोट्या पक्षांनीही मोर्चे, आंदोलने या माध्यमातून अधिवेशनाचा वापर करून घेतला. निवडणुकीच्या तोंडावर खडबडून जागे झालेल्या सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशनाच्या मांडवात निवडणुकीची तोंडावर आपली वरात काढली. आगामी निवडणुकीसाठी सहा महिने बाकी असतानाच प्रचाराची तुतारी फुंकली. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.