Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Belgaon › ‘बॅनर’ हटल्याने चौक झाले मोकळे

‘बॅनर’ हटल्याने चौक झाले मोकळे

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 9:29PMबेळगाव: प्रतिनिधी

‘स्वच्छ आणि सुंदर शहरा’चे विद्रुपीकरण करणारे राजकीय पक्षांचे बॅनर (फलक) प्रशासनाने हटविल्याने शहरातील मुख्य चौकांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. आदर्श संहितेमुळे  निवडणूक आयोगाने असे फलक हटविले आहेत. सरकारी योजनांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणारे मंत्र्यांचे फलकदेखील हटविल्याने आले आहेत.

राज्यात 12 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याची आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्याची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. यातून शहर आणि ग्रामीण भागात उभारण्यात आलेले हजारो फलक हटविण्यात आले आहेत. फलकांनी झाकोळून गेलेले चौक मोकळे झाले आहेत. 

आचारसंहितेच्या काळात फलक उभारणीसाठी परवाना आवश्यक असतो. निवडणूक अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी कडक नियम केले आहेत. या माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्षाला कोणतेही आमिष अथवा आश्‍वासन देता येत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी फलक हटविण्यात आले आहेत.

सामान्यपणे मोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या प्रचारासाठी फलक उभारून जाहिरातबाजी करतात. यातून उत्पादनाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम होते. व्यवसायवृद्धीसाठी हे आवश्यक आहे. परंतु, अलीकडच्या काळात नेत्यांकडून आपले अल्पावधीत बँ्रडिंग करण्यासाठी बॅनरबाजीचा आसरा घेण्यात येत आहे. यातून अल्पावधीत नेत्यांची नवी जमात पैदा झाली आहे. नेत्यांच्या हसर्‍या छब्या चौक, गल्ली, सार्वजनिक ठिकाणे अडवून ठेवत आहेत. यामुळे शहर, गावांचे विद्रुपीकरण झपाट्याने होत आहे.

चन्नम्मा चौक नेहमीच राजकीय बॅनरबाजीचा आखाडा असतो. या ठिकाणी सर्वच पक्षांकडून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी बॅनरबाजीचा आसरा घेण्यात येतो. सध्या हे फलक गायब झाले आहेत. शहरातील अन्य महत्त्वाचे चौक, मार्गदेखील मोकळे झाले आहेत.

ध्वजावरील वक्रदृष्टीमुळे नाराजी

आचारसंहितेची अंमलबजावणी करताना धार्मिक स्थळावरील ध्वज हटविण्यात येत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी कोणत्याही धार्मिक बाबीमध्ये आचारसंहितेची ढवळाढवळ करू नये, अशी मागणी होत आहे. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील काही ग्रा. पं.नी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर फडकत असणारे भगवे ध्वज हटविण्याची नोटीस दिल्यामुळे मराठी भाषिकांत तणाव आहे.

योजना जाहिरात फलकावरही गदा

सरकारच्या कालावधीत अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. त्याचे श्रेय लाटण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांची छायाचित्रे त्यावर छापण्यात येतात. यासाठी लाखो रुपयाच्या सरकारी निधीचा गैरवापर करण्यात येतो. महामार्ग आणि वेगवेगळ्या सरकारी कार्यालयावर वापरलेली मंत्र्यांची छायाचित्रे हटविण्यात आली आहेत. फलकावरील नेत्यांना लपविण्यासाठी काही ठिकाणी अशा फलकावर कागद चिकटण्यात आले आहेत.