Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Belgaon › दक्षिण कर्नाटकात पावसाचा कहर

दक्षिण कर्नाटकात पावसाचा कहर

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:08PMबंगळूर : प्रतिनिधी

गेल्या सहा दिवसांपासून कोडगू,  मंगळूरसह परिसरात संततधार कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती असून संबंधित ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. यासाठी लष्कराला पाचारण करून हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य केले जात आहे. पावसामुळे घडलेल्या अपघात, दरड कोसळणे आणि इतर घटनांमुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

मडिकेरीनजीक असणार्‍या काटकेरी येथे दरड कोसळून यशवंत, व्यंकटरमण, पवन यांचा मृत्यू झाला. गुलबर्गा येथील आळंदमध्ये भिंत कोसळून लक्ष्मीबाई प्रभू वड्डर (वय 30) त्यांच्या मुली अंबिका (11) व यल्लम्मा (9) यांचा मृत्यू झाला. शिमोगा येथील तिर्थहळ्ळीत मसूद (5) या रोजंदारी कर्मचार्‍याच्या मुलाचा घराची भिंत कोसळून मृत्यू झाला. कोडगू-मंगळूर मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुक्कोडलू येथे 40, देवस्तूरमध्ये 100 तसेच विविध ठिकाणी 500 जण पुरामध्ये अडकले आहेत. त्यांना बोटीतून, हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्याचे कार्य लष्करी जवान, अग्निशामक दलाचे जवान, राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण पथक,जलद कृती  दल, स्वयंसेवक करत आहेत.

संततधारेमुळे अनेक मडिकेरी, मंगळूर, केरळसह काही मार्गांवरील 918 बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही पर्यटनस्थळांचाही समावेश आहे. तेथे जाण्यासाठी तिकिट आरक्षित केलेल्यांना त्यांचे पैसे परत देण्यात येत आहेत. आतापर्यंत केएसआरटीसीने 52,78,126 रुपये संबंधितांना परत दिले आहेत. एकूण 8,415 तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.

वाहतूक स्थगित

कंपली-गंगावती, कंपली-शिरगुप्पा, हुवीनहडगलीमधील मरकब्बी-ब्यारहुनी, म्हैसूर-नंजनगुड, सुळ्या-संपाजी, मडिकेरी-मंगळूर, मडिकेरी-सोमवारपेठ, कुशालनगर-हासन, वेनूर-मुडबिद्री यासह अनेक मार्गांवरून वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.