Tue, Jun 25, 2019 16:04होमपेज › Belgaon › एसआयटी अधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी?

एसआयटी अधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी?

Published On: Dec 07 2018 1:50AM | Last Updated: Dec 07 2018 1:50AM
बंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी  पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी 18 संशयितांना अटक करून त्यांच्याविरूद्ध विशेष तपास पथकाने (एसआयटी) आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, संशयितांकडून  कारागृहातून तपास अधिकार्‍यांच्याच हत्येचा कट आखण्यात येत असल्याची संशय आहे. या अधिकार्‍यांना निनावी पत्र पाठविण्यात आले असून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

एसआयटीच्या पाच अधिकार्‍यांनी पोलिस खात्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे. खासगी पिस्तूलचा परवाना त्यांनी घेतला आहे. सर्व्हिस रिव्हॉल्वरचा परवाना त्यांच्याकडे असला तरी ती रिव्हॉल्वर केवळ कर्तव्यावर हजर असताना वापरता येतेे. कुटुंबीयांसोबत असताना किंवा इतरवेळी त्यांच्याकडे पिस्तूल नसते. यासाठीच खासगी परवाना घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरातील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सरकारने या हत्येचा तपास करण्यासाठी बी. के. सिंग आणि अनुचेत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केले होते. वर्षभर तपास केल्यानंतर एसआयटीने 18 संशयितांना पकडून 9 हजार पानी आरोपपत्र दाखल केले.