Thu, Apr 25, 2019 22:08होमपेज › Belgaon › दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश हत्यांसाठी एकच पिस्तूल

दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश हत्यांसाठी एकच पिस्तूल

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 16 2018 11:52PMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या तिघांची हत्या एकाच पिस्तुलाने केल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत दिसून आले आहे. 
गौरी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारा दुचाकीचालक गणेश मिस्कीन याच्या चौकशीवेळी त्याने महत्त्वाचे धागेदोरे दिले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या वेगळ्या पिस्तुलाने करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

लंकेश हत्येतील मास्टरमाईंड अमोल काळेने एम. एम. कलबुर्गी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात दिसून आले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कारवायांचा तो प्रमुख आहे. कलबुर्गी यांनी काही विवादात्मक जाहीर विधाने केली होती. त्यामुळे त्यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी हत्या झाली.

कलबुर्गी यांची हत्या करण्याची सूचना काका ऊर्फ शंकर नारायण नामक व्यक्तीने दिली होती. काकाच्या आदेशानुसार काळेने हत्या केली. सहा महिन्यांपूर्वी काकाचे निधन झाले. त्याचा उजवा हात समजल्या जाणार्‍या व्यक्तीने गौरी यांच्या हत्येचा कट आखला. पण, त्या व्यक्तीचे नाव समजलेले नाही. महाराष्ट्रातील एका संघटनेशी तो संबंधित आहे. 

महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतील नालासोपारा येथे कारवाई करून तिघा संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून 12 पिस्तूल जप्त केल्या. त्यांपैकी एक पिस्तूल हत्येसाठी वापरण्यात आले. सर्व पिस्तूल कर्नाटक ‘एसआयटी’ने ताब्यात घेतली असून गुजरातमधील     फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहेत. 

गौरी हत्येप्रकरणी 12 संशयितांना ‘एसआयटी’ने अटक केली आहे. त्यांपैकी 4 संशयित कलबुर्गी यांच्या हत्येत सहभागी आहेत. तपासावेळी सापडलेल्या पुराव्यांच्या माहितीचा अहवाल ‘एसआयटी’ने कर्नाटक सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चरणरेड्डी यांना दिला आहे. 

गौरी हत्येवेळी  मारेकर्‍यांना मोटारसायकलीवरून नेणार्‍या संशयिताने कलबुर्गी यांच्या हत्येवेळीही मोटारसायकल चालविली होती. इतर तिघांना त्याने हत्येसाठी सहकार्य केले होते, असे ‘एसआयटी’च्या सूत्रांनी सांगितले.

‘पद्मावत’वेळी दंगलीचा कट

गौरी यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांनी ‘पद्मावत’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी पेट्रोल बॉम्ब फोडून दंगल घडविण्याचा कट आखला होता. बेळगावसह हुबळी, शिमोगा आदी ठिकाणी चित्रपटगृहांत प्रेक्षक म्हणून जाऊन तेथे पेट्रोल बॉम्ब फोडण्यात येणार होते. या चित्रपटात वादग्रस्त संवाद असल्याच्या विरोधात हा कट आखण्यात आल्याची माहिती ‘एसआयटी’च्या चौकशीवेळी उघड झाली. आणखी काही कारवायांचा कटही आखण्यात येत होता. मात्र, पहिला संशयित ‘एसआयटी’च्या अटकेत आल्यानंतर सर्वजण एकमेकांपासून दूर झाल्याचे समजते.