Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Belgaon › बेळगावात संमिश्र, खानापुरात फज्जा

बेळगावात संमिश्र, खानापुरात फज्जा

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:35PMबेळगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला बेळगाव, निपाणीत संमिश्र प्रतिसाद लाभला. खानापुरात फज्जा उडाला. बंदमध्ये राज्य परिवहन मंडळ, रिक्षा, वडाप संघटनांनी सहभाग घेतल्याने प्रवाशांंना फटका बसला. बेळगाव बाजारपेठेत दुकाने सुरळीत सुरू होती. वाहतूक सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांची गर्दी कमी होती.

वाढत्या इंधन दराबाबत भारत बंदची हाक देण्यात आली होती. राज्यात सत्तेवर असणार्‍या काँग्रेस -निजदने बंदला पाठिंबा दर्शविला होता. यामुळे बंद यशस्वी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेल्या बंदला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. शहर काँग्रेसतर्फे माजी आ. फिरोज सेठ यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौकात आंदोलन झाले. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.