Wed, Apr 24, 2019 16:09होमपेज › Belgaon › बळ्ळारी नाला अतिक्रमण हटणार कधी?

बळ्ळारी नाला अतिक्रमण हटणार कधी?

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 10:59PMबेळगाव : प्रतिनिधी

हलगा जुन्या पुलाजवळ बळ्ळारी नाल्यावर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात महापालिकेकडे प्रकरण वर्ग करण्यात आले होते. मनपा आयुक्त कृष्णगौडा तायण्णवर यांच्याकडे शेतकरी संघटनेने दाद मागितल्यानंतर बळ्ळारी नाला अतिक्रमण प्रकरण तहसीलदार यांच्या हद्दीत येते, अशी माहिती मनपा शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी दिली होती. त्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांकडे प्रकरण वर्ग झाले आहे. आता तहसीलदार यावर काय निर्णय घेतात, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहीले आहे.   

बळ्ळारी नाला अतिक्रमणासंदर्भात पंतप्रधानांपासून लोकायुक्तापर्यंत पाठपुरावा करण्यात आला. मात्र अजूनही शेतकरी संघटनेला न्याय मिळाला नाही. अतिक्रमण हटले नाही तर पाच गावांची शिवारे पाण्याखाली जाणार आहेत. शिवाय 300 शेतकर्‍यांना रहदारीसाठी मार्ग राहणार नाही. अलीकडे हे प्रकरण महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होतेे. त्यामुळे मनपा आयुक्त कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष होते. शेतकरी संघटनेने आयुक्त कृष्णगौडा तायण्णवर यांची भेट घेतली असता हे प्रकरण तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी दिली. त्याप्रमाणे हे प्रकरण आता दि. 4 रोजी तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहे.

हलग्याजवळ सर्व्हे नं. 85/5 या जमिनीत अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकाम केल्यामुळे पारंपरिक गाडेमार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या भागातील हलगा, जुने बेळगाव, वडगाव, शहापूर व अनगोळ भागातील सुमारे 300 शेतकर्‍यांना रहदारीचा मार्ग बंद झाला आहे. बांधकाम केल्याने  पावसाळ्यात पाच गावातील शिवारात पाणी साचण्याची शक्यता आहे. या सर्व समस्या शासनाच्या निदर्शनास आणूनदेखील बांधकाम हटविण्यात आले नाही. मात्र केवळ पाहणीचे नाटक करण्यात आले असल्याचा आरोप शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

पतंप्रधान, मुख्यमंत्री, नगरविकास खाते, लोकायुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, केंद्रीय तक्रार निवारण केंद्र, माहिती अधिकार खाते यांच्याकडे  शेतकरी संघटनेमार्फत तक्रार करण्यात आली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. आतापर्यंत माजी आ. संभाजी पाटील, मनपा शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर, प्रांताधिकारी कविता योगप्पण्णवर, तहसीलदार स्वादी तसेच भूमापन अधिकार्‍यांनी बळ्ळारी नाल्याची पाहणी केली आहे. मात्र अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

चौकशीचे आदेश

31 जुलै 2017 शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. 31 जुलै 2018 रोजी तहसीलदारांना या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.